पुणे : अट्टल दुचाकी चोरटा पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

पुणे : अट्टल दुचाकी चोरटा पोलिसांच्या ताब्यात

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीणच्या पथकाने पुणे व नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुचाकी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना खोडद (ता. जुन्नर) या ठिकाणी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ लाख १० हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी दिली.

अधिक वाचा : मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या भूमिकेला माझा पाठिंबा; उदयनराजेंची स्पष्टोक्ती (video)

सिद्धार्थ रमेश बर्डे (वय २१, रा. खोडद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याबरोबर वारूळवाडी येथील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसात नारायणगाव, आळेफाटा भागात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरी जात असल्याच्या घटना होत होत्या. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करावा अशा सूचना गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.

अधिक वाचा : पुणे : चिमुकल्यामुळे फसला डॉक्टराचा लुटीचा डाव

त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे पथक या प्रकरणी तपास करीत असताना खोडद या ठिकाणी एक तरुण कुठलाही काम धंदा न करता वारंवार निरनिराळ्या कंपन्यांच्या दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रविवारी (दि. १३) गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, विक्रम तापकीर, सचिन गायकवाड, दिपक साबळे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, संदीप वारे, मुकुंद कदम यांच्या पथकाने पाठलाग करून आरोपी व त्याच्याबरोबर असणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता या आरोपींनी आळेफाटा, रांजणगाव, पारनेर, नारायणगाव, श्रीरामपूर या भागात अनेक दुचाकी चोरी केली असल्याचे पुढे आले आहे. आरोपींना तपासकामी नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Back to top button