पुणे : माय-लेकाचा खून करुन मृतदेह दिले फेकून | पुढारी

पुणे : माय-लेकाचा खून करुन मृतदेह दिले फेकून

पुणे; पुढारी वृत्तसेवा : धानोरी परिसरात राहणाऱ्या माय-लेकाचा खून करून मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला आहे. नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी गावच्या हद्दीत मराठेशाही हॉटेलजवळ एका सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळून आला. या मुलाचा गळा आवळून खून करत महामार्गाच्या कडेला मृतदेह टाकून दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आयान आबिद शेख (वय ६) असे खून झालेल्या मुलाचे नाव असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्यान त्याच्या आईचा मृतदेह  पहाटे पुरंदर तालुक्यातील खळद गावच्या हद्दीत सापडला. तिचाही खून करण्यात आला आहे. आलिया आबिद शेख (वय ३५)  असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ व सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

अधिक वाचा : पुणे : मिशन माळेगाव राबविणार : अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते 

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळस्कर यांनी सांगितले की, जांभुळवाडी गावच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला एका मुलाचे मृतदेह नागरिकांना आढळला. त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्या मुलाचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी मुलाचे शोध घेत त्याचे काही नातेवाईक आले होते. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यात यश आले आहे. त्याचा खून कोणी व का केला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, त्या मुलाचा खून करून त्या ठिकाणी मृतदेह टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांची पथके तपास करत आहेत.

मार्केट यार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक चारचाकी गाडी ( झुम कार) आढळून आली असून, त्या गाडीत रक्ताचे डाग असल्याचे समजते. दरम्यान, पुरंदर तालुक्यातील खळद येथे सासवड ते जेजुरी जाणार्‍या रस्त्याच्या डाव्या बाजूस हॉटेल सूर्याच्या विरुद्ध दिशेला एका ३५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह मंगळवारी आढळून आला होता. सासवड पोलीसांनी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या महिलेच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

अधिक वाचा : उदयनराजेंच्‍या ‘अडवा आणि गाडा’ विधानावर अजित पवार म्‍हणाले….

याबाबत बोलताना सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की, खळद जवळ सापडलेल्या महिलेची ओळख पटली आहे. आलिया शेख असे या महिलेचे नाव आहे. तिच्या गळ्यावर वार करून खुन केल्याचे आढळून आले आहे. या महिलेचा मृतदेह पहाटे आढळून आला होता. त्यानंतर आम्ही तिचा फोटो व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केला होता. त्याची माहिती मिळाल्यावर त्यांचे नातेवाईक आज सायंकाळी पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी महिलेला ओळखले असून ती दोन दिवसापूर्वी आपला पती व मुलाबरोबर फिरायला कारने गेली होती. 

मुलगा व आईचा खुन करण्यात आला असून आलिया शेख हिच्या पतीचा अद्याप कोठेही पत्ता लागलेला नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व गुन्हेशाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरूवात केली आहे.  मात्र हे खून कोणी व कोणत्या कारणातून केले हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. महिलेचा पती शहरातील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.

Back to top button