तालिबान्यांना फॉलो करणाऱ्या अफगाणी नागरिकाला घेतले ताब्यात | पुढारी

तालिबान्यांना फॉलो करणाऱ्या अफगाणी नागरिकाला घेतले ताब्यात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : तालिबानी अतिरेक्यांना सोशल नेटवर्किंग मिडीयावर फॉलो करणार्‍या एका अफगाणी नागरिकाला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेली कित्येक वर्ष हा अफगाणी नागरिक अवैधरीत्या नागपूरात वास्तव्यास होता. या नागरिकांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. 

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना या व्यक्ती बद्दल गुप्त माहिती मिळाली होती. गोपनीय माहिती वरून शहर पोलिसांनी नूर मोहम्मद नामक अफगाणी नागरिकाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून विचारपूस केली असता, तो २०१० पासून नागपूर शहरात अवैधरित्या राहत असल्याचे सांगितले. त्याच्याकडील कागदपत्रे याची तपासणी केली असता बरीच माहिती पोलीसांना मिळाली आहे. 

या व्यक्तीच्या शरीरावर असणारी बंदुकीच्या गोळ्यां लागलेल्या खूणा आहेत. तसेच नागपूर शहरातील इतर अफगाणी नागरिकांनी दिलेल्या माहिती वरून त्याच्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी पोलीसांनी केली. हा संशयीत व्यक्ती काही तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असल्याचे आढळून आले. 

याबाबत नागपूर पोलिस पुढील तपास करीत आहेत. ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, विशेष शाखा व गुन्हे शाखा यांच्या सयुक्त पथकाने केली आहे.

Back to top button