जळगाव : नीलगाईला दुचाकीची धडक; आसोदा येथील तरुण ठार | पुढारी

जळगाव : नीलगाईला दुचाकीची धडक; आसोदा येथील तरुण ठार

जळगाव : पुढारी ऑनलाईन 

शेळगाव भादली रस्त्याने मित्राच्या दुचाकीने रात्री बाहेर निघालेल्या तरुणाच्या वाहनाला निलगायीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सविस्तर माहिती अशी की, श्याम शांताराम कोळी (वय ३६, रा. आसोदा, ता. जि. जळगाव) हा तरुण आईवडील, पत्नी व दोन मुलांसह  राहतो. मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास मित्राची दुचाकी (बुलेट) घेवून कामानिमित्त बाहेर पडला होता. शेळगाव-आसोदा रस्त्यावर एका शेतातजवळून जात असताना रस्त्यावर अचानक निलगायीने जोरदार धडक दिली. यात श्याम कोळी दुचाकीवरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

हा प्रकार आज मंगळवारी सकाळी ६ वाजता शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने उघडकीला आला. श्याम कोळी यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

मृत श्यामच्या पश्चात आई कलाबाई, वडील शांताराम रामदास कोळी, पत्नी सीमा, मुलगा हेमंत आणि मुलगी वैष्णवी असा परिवार आहे. श्यामचे वडील आसोदा ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरीला आहे. एकुलता एक मुलगा असल्याने आईवडीलांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव: बांधकामाचे साहित्य चोरणा-या चौघांना अटक

धुळे: दुकानास गेलेल्या तरुणीचा गळा आवळून खून

जळगाव : २ दुचाकी चोरांना अटक; शहर पोलिसांची कारवाई

Back to top button