डॉ. महेश जाधवला अटक | पुढारी

मिरज ः पुढारी वृत्तसेवा
येथील अॅपेक्स केअर हॉस्पिटलचा संचालक डॉ. महेश जाधव याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कासेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाठलाग करून पकडले. उपचारात हलगर्जीपणा व रुग्णांच्या मृतास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली.
पुढील चौकशीसाठी डॉ. जाधव याला महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.
डॉ. जाधव याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच तो पलायन करीत असताना त्याला पकडण्यात आले, असे निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.
डॉ. जाधव याने मिरज-सांगली रस्त्यावर अॅपेक्स कोरोना हॉस्पिटल सुरू केले होते. हॉस्पिटलमध्ये पुरेशी यंत्रसामग्री नसतानाही कोरोनाच्या दुसर्या लाटेत 205 रुग्णांना दाखल करून घेतले होते. त्यापैकी 87 जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉ. जाधव याने भरमसाट बिलांची आकारणी केली, तसेच डिस्जार्च झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना बिलाची पावती देण्यास देखील टाळाटाळ करण्यात येत होती. आवश्यकता नसतानाही अनेकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन देखील मागविण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारी केल्या होत्या.
त्यानंतर महापालिका आयुक्त, उपायुक्त, आरोग्य विभागाने डॉ. जाधव याच्या हॉस्पिटलवर छापा टाकला होता. दाखल रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्जार्ज दिल्यानंतर हॉस्पिटल बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच नवीन रुग्णांवर उपचार करण्यास बंदी घातली होती.
बंदी आदेश असताना देखील डॉ. जाधव याने हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल करून घेतले. त्यांच्यावर तज्ज्ञांऐवजी होमिओपॅथीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांकडून उपचार केल्याचे महापालिका आरोग्य विभागाच्या तपासणीत उघड झाले. त्यानंतर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी नियमांचा भंग , भरमसाठ बिले आकारून रुग्णांची फसवणूक आणि बिले देण्यास टाळाटाळ करणे अशी फिर्याद दिली.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच डॉ. जाधव याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. तत्पूर्वी महात्मा गांधी चौक पोलिसांनी डॉ. जाधव याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी पाच जण अटकेत असून दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. रुग्णालयातील सर्व कर्मचार्यांचेही जबाबरही नोंदविण्यात आले होते.
त्यानंतर चौकशीत 205 रुग्णांपैकी 87 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने उपचारात हलगर्जीपणा व रुग्णांच्या मृतास कारणीभूत असल्याबद्दल डॉ. जाधव याच्यावर गुरुवारी (दि. 17) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डॉ. जाधव याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सांगली सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने जामीन फेटाळल्याचे समजताच न्यायालयाच्या आवारात वावरणार्या डॉ. जाधव याने तेथून पलायन केले. ते समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने डॉ. जाधव याचा पाठलाग सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कासेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला कासेगाव येथे पकडले. पथकाने त्याला महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडे सुपूर्त केले आहे.
सीसीटीव्ही बंदबाबत सखोल चौकशी होणार
डॉ. जाधव याने कोरोना उपचारादरम्यान हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवले होते. ते का बंद ठेवले, तसेच दोन महिन्यांत रुग्णांकडून किती बिल वसूल केले याचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.