वांद्य्रातही बोगस लस टोचून कंपनीला लुटले | पुढारी

वांद्य्रातही बोगस लस टोचून कंपनीला लुटले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कांदिवलीत हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये 4 लाख रुपये उकळून बोगस लसीकरण करणार्‍या टोळीने  अंधेरी आणि बोरिवलीपाठोपाठ वांद्य्रातही टिप्स कंपनीला बोगस लस टोचून गंडवल्याचे उघड झाले आहे. 

टिप्स कंपनीच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी राजेश पांडे, संजय गुप्तासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आतापर्यंतच्या चौकशीत चारही बोगस लसीकरणामागे एकच टोळी असून कांदिवली पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर  अटकेत असलेले  चार आरोपींचा ताबा इतर पोलीस ठाण्यांना दिला जाणार आहे. 

कांदिवली आणि बोरिवलीतील बोगस लसीकरणानंतर शनिवारी अंधेरी येथेएका चित्रपट प्रॉडक्शन कंपनीने वर्सोवा पोलीस ठाण्यात बोगस लसीकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीने खार पोलीस ठाण्यात याच टोळीविरुद्ध तक्रार केली. टिप्सने त्यांच्या कर्मचार्‍यांसह कुटुंबीयांसाठी लसीकरण करण्याचे ठरवले आणि ठगांच्या टोळीतील राजेश पांडे, संजय गुप्ता व त्यांच्या इतर आरोपींनी  कोकिलाबेन हॉस्पिटलच्या वतीने लसीकरण कॅम्पचे वांद्रे परिसरात आयोजन केले. या कॅम्पमध्ये टिप्सच्या 206 कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबीयांना कोव्हिशिल्डची लस देण्यात आली. त्यासाठी कंपनीकडून 2 लाख 84 हजार 696 रुपये टोळीने उकळले. प्रत्यक्षात लस टोचलीच नाही. काहीतरी भेसळयुक्त द्रव्य व्हॅक्सिन म्हणून देण्यात आले. लस म्हणून काय टोचले हे शोधणे हे आव्हान होऊन बसले आहे. 

कांदिवली पोलिसांच्या पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याचा मोबाईल नवी मुंबईत फेकून दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे या मोबाईलसह संबंधित आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. 

 

Back to top button