नागपुरातील युवकाच्या हत्येचा लाईव्ह व्हिडीओ व्हायरल | पुढारी

नागपुरातील युवकाच्या हत्येचा लाईव्ह व्हिडीओ व्हायरल

नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

नागपुरात झालेल्या एका युवकाच्या हत्येचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला आहे. मंगळवारी (दि .२२)  येथील युवकाची नाग नदीत फिल्मी स्टाईलने हत्या करण्यात आली. ही हत्या होत असताना तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शीने हे व्हिडीओ चित्रण केले आहे. हत्या करून आरोपी पसार झाला आहे. हत्या झालेल्या युवकांचे नाव योगेश धोंगडे (३०) असे आहे. अनैतिक संबधातून योगशची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस उपायुक्त लोहित मातानी यांनी दिली. 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास योगेश धोंगडे हा त्याच्या शिवाजी नगर परिसरातील घरी आला होता. त्याच वेळी आरोपी गोलू हा त्याच्या अन्य काही साथीदारांना घेऊन त्याच्या घरात शिरला. यावेळी आरोपींनी योगेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी गोलूची पत्नी आणि आईदेखील धावत आल्या, त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर योगेश हा शेजारी असलेल्या नाल्याकडे गेला असता, आरोपींनी योगेशवर चाकूने वार केले. जखमी अवस्थेमध्ये योगेश घराकडे आला, परिसरातील लोकांनी त्याला जवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला. 

मृतक योगेशचे परिसरातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, याबाबत आरोपींना समजले. यावरून योगेश आणि आरोपीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. महत्त्वाचे म्हणजे आरोपी गोलू आणि योगेश चांगले मित्र देखील होते. मात्र वादातून योगेशची हत्या करण्यात आली आहे.

Back to top button