सांगली : सव्वाचार लाखांची औषधे मिरजेत जप्त | पुढारी

सांगली : सव्वाचार लाखांची औषधे मिरजेत जप्त

मिरज ः पुढारी वृत्तसेवा

येथील अ‍ॅपेक्स कोरोना रुग्णालयात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. 4 लाख 30 हजारांचा औषध साठा जप्त केला. रुग्णालयातून औषध विक्री करण्यास परवानगी नसतानाही संचालक डॉ. महेश जाधव याने सांगलीतील खासगी दुकानाच्या नावावर औषध विक्री केल्याचे चौकशीत समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली.

अ‍ॅपेक्स कोरोना रुग्णालयात एकूण 205 रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 87 जणांचा मृत्यू झाल्याची तक्रार आहे. याप्रकरणी डॉ. जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यासह आठजणांना अटक करण्यात आली आहे.

डॉ. जाधव याने रुग्णालयात कोणतीही सुविधा नसताना रुग्ण दाखल करून घेऊन त्यांची लूट केली. तसेच रुग्णालयाला औषध विक्रीची परवानगी नसताना देखील त्याने सांगलीतील एका खासगी दुकानाच्या नावावर अ‍ॅपेक्स रुग्णालयातून लाखो रुपयांच्या औषधांची विक्री केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.

तपास अधिकार्‍यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिल्यानंतर पथकाने  आज  अ‍ॅपेक्स कोरोना रुग्णालयावर छापा टाकला. यावेळी रुग्णालयातून  कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन, गोळ्या आणि प्रतिजैविके इत्यादींचा साठा जप्त केला. 

परवानगी नसताना देखील लाखो रुपयांचा औषधसाठा करून त्याची विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनकडून डॉ. जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button