फौजदाराच्या पतीसह पोलिसाला अटक | पुढारी | पुढारी

फौजदाराच्या पतीसह पोलिसाला अटक | पुढारी

सातारा/औंध : पुढारी वृत्तसेवा

औंध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सोसारख्या संवेदनशील व गंभीर गुन्ह्यात मदत करण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयांची लाच मागून त्यातील रोख 50 हजार रुपये घेणार्‍यास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ कारवाई केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, यामध्ये औंध पोलिस ठाण्याच्या महिला फौजदाराच्या पतीचा व एका पोलिस हवालदाराचा समावेश असल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत दादासाहेब शिंदे (वय 34, रा. गुरसाळे ता. खटाव) असे पोलिस हवालदाराचे नाव आहे. तर, सुशांत सुरेश वरुडे (35, मूळ रा. विटा, जि. सांगली सध्या रा. औंध) असे फौजदार पतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांच्या भावावर औंध पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा (पोक्सो) गुन्हा दाखल झालेला आहे. भावाला या गुन्ह्यात मदत व्हावी व तक्रारदार यांना त्याप्रकरणात सहआरोपी करू नये. यासाठी ते पोलिस हवालदार चंद्रकांत शिंदे व सुशांत वरुडे यांना भेटले. यावेळी सुशांत वरुडे याने शिंदे याच्या सांगण्यावरून 1 लाख 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. पैसे दिले तर सहकार्य करू, असे वरुडे याने सांगितले. मोठ्या रकमेच्या लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा एसीबीमध्ये तक्रार केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अविनाश जगातप, पोनि अरिफा मुल्‍ला यांनी सोमवारी सापळा लावला. एसीबीने पडताळणी केली असता दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदार यांनी तडजोड केली असता 50 हजार रुपये घेण्याचे ठरले. पैसे देण्यासाठी जागा व वेळ निश्‍चित झाल्यानंतर फौजदारच्या पतीने लाचेची रक्‍कम स्वीकारली. रक्‍कम स्वीकारताच एसीबी विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

एसीबी विभागाने संशयित सुशांत वरुडे याच्याकडे प्राथमिक चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्याने पोलिस हवालदार चंद्रकांत शिंदे याचे नाव घेतले. एसीबी विभागाने तात्काळ त्याला ताब्यात घेतले. एसीबीने प्राथमिक कारवाईची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संशयित दोघांवर औंध पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशीरा दोन्ही संशयितांना अटक केली. पोक्सो सारख्या संवेदनशील गुन्ह्यात लाचेची मागणी झाल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फौजदार महिलेकडेच तपास…

पोक्सो अंतर्गत तीन दिवसांपूर्वी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर  याचा तपास महिला फौजदार स्नेहल सोमदे यांच्याकडे देण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. गुन्ह्याचा तपास सुरू असताना मात्र दुसरीकडे काही नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. यासाठी फौजदार पती व पोलिस हवालदार जुंपले गेले. ‘फोनाफोनी’ व ‘भेटाभेटी’ झाल्यानंतर ‘देवाणघेवाणी’चा विषय सुरू झाला. अखेर तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेतल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. 

Back to top button