यवतमाळ : गोळ्या झाडून तरुणाची हत्या  | पुढारी

यवतमाळ : गोळ्या झाडून तरुणाची हत्या 

यवतमाळ ; पुढारी वृत्तसेवा :  अनोळखी इसमाने केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला आहे. येथील स्टेट बँक चौकात बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली. करण परोपटे (वय २६) रा. चांदोरे नगर यवतमाळ असे मृताचे नाव आहे. 

अधिक वाचा : गोव्यात स्थापन होणार आंतरराष्ट्रीय कायदा शिक्षण, संशोधन विद्यापीठ

करण हा स्टेट बँक चौकातील एका हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी थांबला होता. सोबत पाच साथीदार होते. अचानक त्यांच्यामध्ये वाद झाला. वादावादीत करणवर गोळीबार झाला. यातील तीन गोळ्या करणच्या पोटात लागल्या, तर एक गोळी हॉटेल मालक गंगा गुप्ता (वय ४८) रा. नेहरूनगर यवतमाळ यांच्या पायाला लागली. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी दोन धारदार चाकूने करणच्या पोटात सपासप वार केले. तो जागेवर कोसळल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. 

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने करणला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले तर जखमी गंगा गुप्ता यांच्यावर उपचार सुरु आहेत. यवतमाळ शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. यातूनच करणची हत्या झाल्याची चर्चा आहे.

घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, एसडीपीओ माधुरी बाविस्कर, एलसीबीचे निरीक्षक प्रदीप परदेशी, शहर ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयितांच्या शोधात पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनेमागे नेमके कारण कळू शकले नाही.

अधिक वाचा : मोस्ट वॉन्टेड हाफिज सईद आहे तरी कोण, ज्याच्यावर अमेरिकेनं ७० कोटींचं बक्षीस लावलंय? 

घटनास्थळावर जिवंत काडतूस, चाकूचे कव्हर…

बुधवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. परोपटे यांच्यावर दोघांनी गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या त्याच्या पोटावर तसेच पाठीवर लागल्या. त्यानंतर आरोपीने धारदार चाकूने सपासप वार केले. घटनास्थळावर मॅक्झिन, एक जिवंत काडतूस, चार बंदुकीच्या गोळ्यांच्या पुंगळ्या तसेच चाकूचे कव्हर पडून होते. 

Back to top button