दहा रुपयांचे रिचार्ज करण्यास सांगून 50 हजाराला गंडा | पुढारी

दहा रुपयांचे रिचार्ज करण्यास सांगून 50 हजाराला गंडा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

ऑनलाईन सर्व्हिस अ‍ॅप डाऊनलोड करून दहा रुपयांचे रिचार्ज करण्यास सांगितले. रिचार्ज केल्यानंतर आलेला ओटीपी विचारून एका वृध्दाला तब्बल 49 हजार 600 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. दहा रुपयाचे रिचार्ज करण्यास सांगून फसवणूक करण्याचा प्रकार आठवड्यामध्ये दुसर्‍यांदा घडला आहे.

बसवराज सिद्रामप्पा कोनापुरे (वय 73, रा. सुविधा नगर, विजापूर रोड) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. रविवार, 20  जून रोजी कोनापुरे हे राहत्या घरी बसले होते. त्यावेळी त्यांना तुमच्या सीमकार्डचे कागदपत्र पेन्डिंग आहेत, कस्टमर केअरला फोन करा, असा मॅसेज त्यांना आला. 

यावेळी कोनापुरे यांनी मॅसेज आलेल्या नंबरवर फोन केला. समोरून बोलणार्‍या व्यक्तीने मी बीएसएनएल कस्टमर केअरमधून बोलत असून मोबाईलवर ऑनलाईन सर्व्हिस अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून एटीएम कार्डवरून दहा रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगितले. कोनापुरे यांनी दहा रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर त्यांना चार अंकी ओटीपी क्रमांक आला. चार वेळा आलेला ओटीपी क्रमांक विचारल्यानंतर कोनापुरे यांनी फसवणूक करणार्‍या व्यक्तीस ओटीपी सांगितला. 

ओटीपी सांगितल्यानंतर कोनापुरे यांच्या खात्यातून 25 हजार, दोन वेळा 10 हजार आणि 9 हजार 800 रुपये कट होऊन पेएटीएम नोईडा  येथे खरेदी झाल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोनापुरे यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फौजदार वाल्मिकी हे करीत आहेत. 20 जून रोजी ज्येष्ठ नागरिकास रिचार्ज करण्यास सांगून नऊ लाखांची फसवणूक करण्यात आली होती.  

 

Back to top button