धुळे : सूतगिरणीच्या गोदामात मद्य कारखाना; उत्‍पादन शुल्‍कमधील पाच अधिकारी निलंबित | पुढारी

धुळे : सूतगिरणीच्या गोदामात मद्य कारखाना; उत्‍पादन शुल्‍कमधील पाच अधिकारी निलंबित

धुळे; पुढारी वृत्तसेवा : शिरपूर शहरातील मुंबई-आग्रा महामार्गालगत एका बंद सुतगिरणीच्या गोदामात बनावट मद्याचा कारखाना सापडल्याचे प्रकरण राज्य उत्पादन शुल्क‍ विभागातील अधिका-यांना चांगलेच भोवले आहे. या विभागाच्या पाच अधिका-यांना निलंबित करण्यात आले असून, धुळे जिल्हयातील अधीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

धुळे जिल्हयातील शिरपूर तालुका बनावट मद्य तयार करण्याच्या तस्करीत बदनाम झाला आहे. या तालुक्यातील सांगवी व मध्य प्रदेशालगत असलेल्या गावांमधे अनेक वेळेस कारवाई झाली आहे. पण गेल्या आठवडयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील पथकातील संताजी लाड, निरीक्षक मनोज चव्हाण व अन्य कर्मचाऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गालगत शिरपूर शहरालगत अजंदे शिवारात असलेल्या एका बंद सूतगिरणीच्या गोदामात छापा टाकला. या गोदामातून सुमारे दीड कोटी रुपयाचे बनावट मद्य तसेच कच्चे रसायन मिळून आले.

घटनास्थळी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, खोके तसेच बाटलीवर लावण्याचे स्टिकर, बूच असा ऐवज पहाता येथून मोठया प्रमाणावर बनावट मद्याची निर्मिती होत असल्याची बाब निदर्शनास आली. या प्रकरणात प्राथमिक पाहणीत राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा असल्याची बाब पुढे आल्याने या विभागातील निरीक्षक अंकुश सुर्यवंशी, दुय्यम निरीक्षक मधुकर पवार, बी आर नवले, सहायक उपनिरीक्षक गोळेकर व जवान बोरसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर धुळ्याचे अधीक्षक यांचीदेखील तातडीने बदली करण्यात आली आहे. दरम्यान, अजंदे शिवारात असलेल्या या तथाकथित कारखान्याच्या समोरुन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाडाखेड येथील अधिका-यांचे येणे जाणे होते. तसेच या ठिकाणी गेल्या दीड ते दोन वर्षापासून बनावट देशी मद्य तयार केले जात असल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे या कारखान्यामधून मद्य घेवून विक्री करणाऱ्या तस्करांपर्यंत पोहोचण्याचे तपास यंत्रणेसमोर आव्हान आहे.

Back to top button