सावंतवाडी : लग्‍नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवरच अत्याचार! | पुढारी

सावंतवाडी : लग्‍नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवरच अत्याचार!

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
लग्‍नाचे आमिष दाखवून एका शिक्षिकेवर सातत्याने अत्याचार करून तिचे अश्‍लिल फोटो नातेवाईकांना पाठवून व्हायरल केल्याप्रकरणी कणकवली तालुक्यातील आशिये येथील जि.प. शिक्षकांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित दिलीप ठाकूर (40) असे त्या शिक्षकाचे नाव असून त्या शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी त्याला अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

कणकवली-आशिये येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत अमित ठाकूर या विवाहित शिक्षकाची मैत्री सावंतवाडी तालुक्यातील एका प्राथमिक शिक्षिकेशी झाली. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत व त्यानंतर प्रेमात झाले. दरम्यान ठाकूर याने आपला विवाह झाल्याचे तिच्यापासून लपवून ठेवले. तो सातत्याने सावंतवाडीत तिला भेटण्यासाठी येत असे. त्याने पीडित शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सावंतवाडी व अन्य ठिकाणी नेत अत्याचार केला. त्याशिवाय तिचे अश्‍लिल फोटो काढून ते नातेवाईकांना पाठवून व्हायरल केले. यानंतर त्या शिक्षिकेने अमित ठाकूर याच्याकडे लग्‍नासाठी तगादा लावला असता त्याने लग्‍न करण्यास नकार दिला.

आपला विवाह यापूर्वीच झाला असून आपणास दोन मुले असल्याचे त्याने पीडित शिक्षिकेला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या शिक्षिकेने गुरुवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून शिक्षक अमित दिलीप ठाकूर याच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात भांदवि कलम 376, आय टी कायदा कलम अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली. त्याला सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे करीत आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button