INS Vikrant : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची इतकी चर्चा का होते?

file photo
file photo
Published on
Updated on

स्वालिया शिकलगार, पुढारी डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज केरळमधील कोची शिपयार्डमध्ये 'आयएनएस विक्रांत' (INS Vikrant) या युद्धनौकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INS Vikrant वर नौदलाचा नवीन ध्वज 'निशाण'चे अनावरण केले. 'आयएनएस विक्रांत' ही पहिली स्वदेशी बनावटीची युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला. नौदलाच्या नवीन ध्वजाला वंदन करुन मी हा नवीन ध्वज भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले, घोडदळ, पायदळ, गडकोट, याबरोबरचं मराठा स्वराज्याच्या संरक्षणासाठी आरमार उभारले. परकीय सत्तांपासून स्वराज्याला वाचवण्यासाठी सागरी ताकद ओळखून खंबायतच्या आखातापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता काबीज करून मराठ्यांचे वर्चस्व स्थापित केले.

शिवरायांसी आठवावे| जीवित तृणवत मानावे| इहलोकी परलोकी उरावे|किर्तिरुपे||

'आरमार हे राज्याचे स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्य मेव करावे.' असं आज्ञापत्रात म्हटलं आहे. त्याकाळातील आरमाराचे महत्त्व सांगणारे हे आज्ञापत्रातील वर्णन होय. जाणता राजा, निश्च्यायाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराची सुरूवात नक्की कधी व कशी केली, याविषयी मराठा इतिहासात थेट नोंद नाही. परंतु, बखरी आणि युरोपीय नोंदीमधून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात माहिती समोर येते, असा संदर्भ 'मराठा आरमार एक अनोखे पर्व' या डॉ. सचिन पेंडसे यांच्या पुस्तकात सापडतो.

छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि कौशल्याच्या बळावर समुद्र सुरक्षिततेचे महत्त्व ओळखून मराठा आरमार दलाची (इंडियन नेव्ही) स्थापना केली. आज भारतीय नाविक दल छत्रपती शिवाजी महाराजांना 'Father of Indian Navy' (भारतीय आरमाराचे जनक) मानते. शिवरायांनी त्याकाळी हिंदुस्थानातील पहिले जहाज निर्माण करुन सागरी सुरक्षेची मुहूर्तमेढ रोवली. खंबायतच्या आखातापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता काबीज करून मराठ्यांचे वर्चस्व स्थापित केले. 'ज्याचे आरमार त्याचा समुद्र' ही कृती लक्षात घेऊन समुद्रावर आपलं स्वत:चं वर्चस्व निर्माण करायचं असेल आणि समुद्र जिंकायचं असेल तर आरमाराची आवश्यकता असल्याचे छत्रपतींना वाटले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांच्या आक्रमणांपासून हिंदुस्थानला वाचवायचे असेल तर स्वतःचे आरमार हवे, हे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळीच ओळखले होते.

१६५९ ला महाराजांनी आरमाराची मुहुर्तवेढ रोवली असा उल्लेख सापडतो. इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन म्हणतात, मराठ्यांकडे युद्धाची परंपरा असली तरीही समुद्र हा त्यांच्यासाठी एक नवीनच पैलू होता. भारताच्या इतिहासात शिवाजी हे कदाचित एकमेव राजे होते, ज्यांनी नौदलाची स्थापना राजकीय दृष्टीने केली. महाराजांनी केवळ साम्राज्याच्या संरक्षणासाठी आरमाराचा उपयोग केला नाही तर व्यापाऱ्याच्या दृष्टीनेदेखील खुबीने त्याचा वापर केला.

आरमार उभारण्यासाठी महत्त्वाची कारणे –

  • युरोपीय शक्तींना राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवणे.
  • कोकणातील प्रजेचे सिद्दी आणि पोर्तुगीजांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करणे.
  • बंदरे आणि त्यांमधून होणाऱ्या व्यापार आणि उत्पन्नाचे रक्षण करणे
  • व्यापारी जहाजांची सुरक्षा करणे
  • नाविक नाकेबंदीपासून कोकणाचे संरक्षण करणे.

आरमारी जहाजांचे प्रकार-

मराठ्यांच्या युद्धनौका

साधारणपणे ७० टन क्षमतेचे असून वल्ह्यांच्या सहाय्याने हाकले जाई. यात २० माणसे बसतील, अशी सोय होती.

गुरब – १५० ते ३०० टन क्षमतेचे असे. गुरबाच्या वरची बाजू बांबूची बनलेली असे. पुढच्या भागात नाळ असे. या बांधणीमुळे प्रवासात ते मोठ्या प्रमाणात हेलकावे घेत असे. गुरबाच्या वरच्या बाजूला भागात नाळेवर ९ ते १९ पौंडाच्या दोन तोफा असत. या तोफा पुढच्या बाजूला डागल्या जात तर गुरबाच्या बाजूला ६ ते ९ पौंडाच्या तोफा असत.

पाल – मराठा आरमारातील सर्वात मोठी युद्धनौका होय. विजयदुर्गाच्या लढाईनंतर ७४ तोफा असलेले एक मोठे (पाल) इंग्रजांना सापडले होते. पाल हे दुमजली असे. वरच्या भागात एक आराम करण्यासाठी आणि निरीक्षणासाठी जागा असे.

व्यापारी जहाजे

मचवा – याचा उपयोग मुख्यत: मासेमारी आणि सामान वाहून नेण्यासाठी केला जात असे. मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या मचव्यास कोला किंवा कोळी मचवा असे म्हटले जाई. यात शिडांच्या उपयोगाबोरबर वल्ह्यांचाही वापर करण्यात येत असे. काही मोठ्या मचव्यांवर २-६ तोफा ठेवून त्यांचा आरमारात उपयोग केला जात असे. मचवा २ ते ३ टन क्षमतेचा असे आणि त्यात ५० माणसे मावत.

महागिरी – महागिरी २० ते ३० टन क्षमतेची असे. महागिरीचा वापर मंगलोरहून विटा आणि कौले आणण्यासाठी केला जात असे. महागिरीवर शीड आणि वल्ही याचा उपयोग केला जात असे.

पटीमार – पटेमारी, पटेमार

पटीमार हे मचव्यापेक्षा मोठे, अरूंद, देखणे हाज असे. पटेमार २५ ते १०० टन क्षमतेचे असे. पटेमार हे अतिशय वेगवान असून सामान वाहून नेण्याची क्षमता अधिक असे.

शिबाड-  शिबाड ही पटेमारची मोठी आवृत्ती होती. शिबाडाचे वेगळेपण त्याच्या चौकोनी आकाराची मागची बाजू यातून दिसे. पाल व्यतिरिक्त इतर भारतीय जहाजांची मागची बाजू निमुळती असे.

बटेला – मचवा आणि पडावाची मोठी आवृत्ती म्हणजे बटेला. बटेलाचा उपयोग मलबार, कोकण, गुजरातमधील वाहतुकीसाठी केला जात असे.

जहाज बांधणी – जहाज बांधणीसाठी इमारती लाकडाची उपयोग करण्यात येत असे. जहाजाचे पठान (keel), बाहेरील फळ्या आणि समुद्राच्या पाण्याशी संबंध असलेले भाग हे लाकडांपासून बनवलेले असतं. तर जहाजाच्या आतील भागासाठी उंडी, आंबा, फणस या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जात असे. डोलकाठ्यांसाठी पुन्नी आणि आइन ही दोन प्रकारची लाकडे उपयोगात आणली जात असे. मराठ्यांच्या काळात उत्तर कोकणात कल्याण, भिवंडी, वसई, ठाणे, कुलाबा या जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर नागाव आणि बाणकोट, विजयदुर्ग येथे जहाजबांधणी होत असे.

युरोपीय जहाजे –गॅलिओत, गल्लीयोत, गॅलीओते, कॅरक, गॅलियन, कॅरवेल, चौकौनी शिडाचे कॅरवेल, फ्रिगेट, Ship of the line, मॅन ऑफ वॉर, बॉम्ब वेसल (बॉम्ब केच), स्लूप, इस्ट इंडिया मेन, छत्रपती महाराजांनी खुबीने आरमारात व्यापारी दृष्टीकोन आणला. समुद्री व्यापार वाढवण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न इंग्रज, पोर्तुगीज, डच इ. च्या विविध नोंदीतून हे स्पष्ट होतात. १२ मार्च, १६६५ मधील एका नोंदीनुसार, महाराजांच्या ताब्यातील ८-९ बंदरामधून दरवर्षी २-३ जहाजे पर्शिया, बसरा आणि मोख्याला व्यापारासाठी पाठवत असल्याची नोंद आहे. या काळात कोकणातून तांदूळ आणि मिठाचा व्यापार, दाभोळ, कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला, पेण आणि राजापूर या बंदरातून होत असे.

जलदुर्ग –

कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेबरोबरच, संदेशवहन, दळणवळण, व्यापार ही आरमार आणि जलदुर्ग उभारणीची काही प्रमुख उद्दीष्टे आहेत. आरमाराच्या हालचाली, संरक्षण यातून जलदुर्गाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी-उंदेरी विजयदुर्ग, सुवर्णदुर्ण असे कित्येक जलदुर्ग आणि आरमार यांची जोड संरक्षण आणि व्यापाराला होती.

आरमारी तोफा – आपल्या आरमारांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आरमारी तोफांच्या मारक शक्तीचा पुरेपूर उपयोग करून आरमारी तोफखाना ही नवी संकल्पना पुढे आली. आरमारी तोफांचा उपयोग पहिल्यांदा १५ व्या शतकात करण्यात आला आणि या तोफांमुळे काही अंतरावरूनच शत्रूच्या जहाजांना बुडवता येते, हे आढळल्यानंतर तोफा या जहाजावरील मुख्य अस्त्र म्हणून प्रस्थापित झाल्या.

त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥

या पंक्तीप्रमाणे छत्रपती महाराजांची स्वराज्य संरक्षण, अर्थव्यवस्थेची नीतीबाबतचा दूरदृष्टीकोन किती अफाट होता, हे दिसून येते. महाराजांनी स्थापलेल्या या आरमाराने हिंदुस्थानच्या इतिहासातील एका नवीन पर्वाची सुरूवात झाली, असं म्हणायला हरकत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news