12th result : मित्रानों, आपली लायकी मार्क ठरवत नाही!!! - पुढारी

12th result : मित्रानों, आपली लायकी मार्क ठरवत नाही!!!

पुढारी ऑनलाईन; बाळ पाटील : १० वीचा निकाल लागला आणि अपेक्षित होतं म्हणा किंवा खात्री होती म्हणा माझे दोन विषय राहिले. वर्षभर काहीच शिकवलं गेलं नव्हतं आणि आपल्याला काही शिकायचं आहे याचीही जाणीव नव्हती. निकाल लागल्यावर बरोबरची मुलं पास झाली होती आणि मी नापास.

मला वाईट वाटत नव्हतं आणि काही भावनाही होत नव्हत्या. एकप्रकारचे बधीरपण आले होते. तसे नापास होणारे आम्ही दोघे तिघे. जणू काही हे अपेक्षित आहे असे घरच्यांनी स्वागत केले. कुणी काही बोलले नाहीत पण घरात, गल्लीत, गावात, पै-पाहुण्यांत मार्केट एकदम डाऊन झाले. घरातल्यांनी कामं लावण्याची, बोलण्याची, वागण्याची सगळीच पद्धत केवळ एकट्यासाठी बदलली.

मी आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि आपल्याला इतरांसारखं आनंदी राहता येत नाही, असं काहीतरी जाणवत नव्हतं. पण, नेमक्या काय भावना आहेत हेही कळत नव्हतं. आसपासचं जग सगळीकडून अंगावर येत होतं आणि आपण मोठी चूक केली आहे हे अधोरेखित व्हायचं.

नापासाचा शिक्का बसल्यानं फारसं काही कुणाशी बोलायला गेलं तर कुणी लक्ष द्यायचं नाही. कुणाशी बोलावं तर ते टाळायचे. पै- पाहुण्यांत गेलं की मी भरलेल्या ऑक्टोबरच्या फॉर्मची आणि आईवडिलांच्या नशिबी असे कसे भोग आले याचीच चर्चा व्हायची. आपसूक मी केलेल्या सर्व चुकांची मीठ-मसाला लावून उजळणी व्हायची. आई, आजीचं रडू तर घायाळ करायचं आणि आपण का जगतोय असा प्रश्न काळजाला चरा पाडून जायचं. ऑक्टोबरला फॉर्म भरला पण पुढे काहीच झालं नाही.

गणितातलं काहीच कळत नव्हतं. तरीही जोड्या जुळवा, गाळलेल्या जागा भरा आणि तत्सम प्रश्नांच्या जोरावर मुसंडी मारायचा प्रयत्न केला. इंग्रजीत परिच्छेद वाचून काही प्रश्न सोडवले आणि आय हॅव वापरून निबंध लिहिला. मनात खात्री होती की आपण यावेळीही नापास. आता आसपासच्या वातावरणानं एक बधिरपण आणलं होतं. माझ्याबरोबर माझ्या लांबच्या आत्याचा मुलगा दहावी पास झाला होता.

तो कॉलेजवरून येताना दिसला की, वडिलांचा रागाचा पारा चढत असे आणि मला दुप्पट ताकदीने शेतातल्या कामाला जुंपत असत. एखादे काम करायला लागलो की मग ते म्हणायचे, ‘तू हात लावलास आता काय काम होतंय.’ असा नापास हा शिक्का बसल्यानं ‘हातगुण’ ही वैगुणात बदलला.

पुन्हा नापासाचा शिक्का

डिसेंबरला निकाल लागला आणि अपेक्षेप्रमाणे नापास. पुन्हा मार्चलाही नापास. असे दोन फेर झाल्यानंतर गाव सोडायचा एक मार्ग मिळाला. गावातल्याच एका मुलाबरोबर शहर गाठलं आणि तिथंच एका हॉटेलात नोकरी धरली. कधी तरी गावी निघालो आणि ज्या गावात दहावीला होतो तेथे एकजण ओळखीचा भेटला आणि माझा एकूण टापटीप पोषाख बघून म्हटला, ‘काय करतोस सध्या?’ तेव्हा डी.एड् म्हणजे प्रतिष्ठेचा कोर्स.

त्यामुळे मी त्याला दाबून सांगितले. ‘डी.एड्’ करतोय.’ झालं. पुढे त्याला माझ्या वर्गातील पास झालेली पोरं भेटली आणि त्यांना ही गोष्ट समजली. मग ते गावात मला चिडवू लागले. ‘काय मास्तर. डी. एड कवा संपायचं?’ असं सगळं होत होतं. जी वळणं चुकवायचा प्रयत्न करत होतो तीच वळणं मला लागत होती. मग गावी जायचंच बंद केलं.

मार्ग मिळाला

पुढं आमच्याच नात्यातला चांगला शिकलेला एक दादा भेटायला कोल्हापूरला आला आणि त्यानं विचारलं, ‘हॉटेलातच नोकरी करणार का?’ माझे उत्तर अर्थात हो होतं. आपण गावातल्या, घरातल्या न्यूनगंडाने पछाडण्यास कारणीभूत असलेल्या वातावरणाला कंटाळलो आहोत याचे विश्लेषण करता येत नव्हते. पण त्याने ते ओळखले आणि मला मोलाचा सल्ला दिला.

‘फक्त दहावी पास हो. पुढे तुला कुणी काही बोलणार नाही. मी मदत करतो. ’ झालं. गावी आलो. शहरात शर्ट आणि फुल पँट घालायला शिकलो. गावातही अनेकदा तसात गेलो होते. पुन्हा त्या दादानं शाळेत घातलं. पण शाळेत केवळ दोनच विषय शिकायचे असे ठरले. ही शाळा माझ्या आधीच्या शाळेपेक्षा जास्त कडक शिस्तीची आणि शिक्षणासाठी नावाजलेली. दिवसभर शाळेत बसायचं.

मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल असे तास असले की, बाकीच्या मुलांकडं बघायचं. या विषयाचे शिक्षकही हा नापास झालेला टोणगा आहे म्हणून त्यांच्या विषयाचे काही प्रश्न विचारायचे. माझी भंबेरी उडालेली पाहून मुलं हसायची. पुन्हा पाचवा किंवा सहा तास इंग्रजीचा. पुन्हा नववा तास गणिताचा. असा सगळं दिवस वर्गात बसून काढायचा. शाळा सुटली की एका झाडाखाली येऊन फुल पँट घालायची आणि गावाकडे यायचे.

असं करून ऑक्टोबरला गणिताचा विषय ५३ मार्कांनी आणि मार्चला इंग्रजी ३६ मार्कांनी पास झालो. ज्या दिवशी निकाल लागला तेव्हा आसपासचे वातावरण बदलले. मीही गाव सोडले नाही आणि गावातच टिच्चून कॉलेज करायचे ठरवले. ११ वी, १२ वीला आसपसाचे सगळे बोलणे थांबले. पुढे १२ वीला टिच्चून अभ्यास केला आणि गणित नसल्याने सगळ्या विषयात डिस्टिंक्शन मिळविले.

मी पास झालो होतो, पण मी घरी आल्यानंतर घरात सुतकी वातावरण होते. घरी आलो तर सगळे सुन्न बसून होते. मी किलोभर पेढे घेऊन आलो होतो. तरीही घरच्यांना पटत नव्हते की मी चांगल्या मार्कांनी पास झालोय. माझ्या एका मित्राने पास व्हायला किती मार्क आणि मला पडले किती याचे गणित घरच्यांना समजावून सांगितले आणि मग कुठे ताण हलका झाला.

मार्क झुगारून दिले

त्या दिवशी मला कळले की, आपली लायकी गुणांवर ठरते तर आपण हे सगळं झुगारून का देऊ नये. मधल्या काळात कादंबऱ्या वाचायचा नाद लागला होता. जनावरं चारायलं गेलं की, मी वाचत बसतो आणि जनावरं कुणाच्या तरी शेतात जाऊन पिकं खातात अशा तक्रारी यायला लागल्या. मग वाचण्यावरही बंधनं आली.

न्यूनगंडातून बाहेर येण्याचा मार्ग वाचन होता हा शोध थोडा थोडा लागला होता. थोडा थोडा याचा अर्थ सगळ्याच संकल्पना किंवा अबोधावस्थेतील भावना आपल्या आपणच विस्तार करून समजून घेण्याच्या विश्वात मी राहत होतो. १२ वीचा निकाल ज्या दिवशी होता त्या दिवशी माझ्या घरचे सुन्न बसले होते. तसेच शेजारी, गल्लीतील, पै पाहुणे, मित्र असे सगळे पुन्हा एकदा हसायला मिळणार. याच्या मिजाशा उतरवायच्या कशा असे मनात मांडे रचत बसले होते.

अनेक जवळच्या पाहुण्यांना पेढे द्यायला गेल्यावर अविश्वासाने माझ्याकडे पाहत होते. मार्कलिस्ट पाहिल्यावरच त्यांना विश्वास बसला. एकूण काय तर आपली लायकी मार्कांवर आहे असा या सगळ्यांनी करून दिलेला समज. पण अजून सगळंच भावविश्व अबोधावस्थेत होतं. मी सर्वांची गंमत पाहत होतो. पण १० वी निकाल लागल्यानंतर ज्यांनी मला जीव नको करून सोडला होता, ते मला पुढे काय करायचे हे सांगून भंडावून सोडत होते. मी सरळ शहराचा रस्ता धरला आणि कॉलेज सुरू केलं. एका हॉटेलात नोकरी करायची आणि कॉलेज, वाचन असं विश्व ठेवलं. १२ वी निकाला लागला  तेव्हा ज्या भूगोलला ९० मार्क पडले होते त्याच विषयाला एफवायला ३६ मार्क पडले.

इंग्रजीत सर्वाधिक गुण

पण मला काहीच फरक पडला नाही. मला माहीत होते, आपण नापास झालो तरी काहीच फरक पडत नाही. या मार्कांवर आपलं आयुष्य नाही. चार दोन कविता केल्या आणि त्या कॉलेजच्या नियतकालिकात छापून आल्या. वाचतोय म्हणून सर आवडीनं नवी नवी पुस्तकं सुचवत होते. एफवाय काठावर पास झालो. आणि एस. वाय. ला डी. आर. कोण्णूर नावाचे एक इंग्रजीचे विद्वान प्राध्यापक आम्हाला एक इंग्रजीचा पेपर शिकवत होते. ते आमचे प्राचार्य.

त्यांचे एक लेक्चर केले आणि मी न चुकता लेक्चर करू लागलो. तल्लीन होऊन इंग्रजी ऐकायचो. त्यांच्या पेपरला मला ४७ मार्क मिळाले. माझा आनंद गगनात मावत नव्हता. टी. वाय. ला इंग्रजीच विषय ठेवायचा निग्रह होता पण सर शिकवणार नाहीत म्हटल्यावर तो निग्रह मोडला. टी. वाय. काठावर पास झालो आणि एम. ए.ला दोन वर्षांचे मिळून ७२ टक्के मिळाले. त्या वर्षीचे भाषा विषयाचे गोल्ड मेडल ७२. ५० टक्क्यांना मिळाले.

अवघ्या ५० पॉइंटने गोल्ड मेडल गेलं होतं. तरीही मला काहीच वाटलं नाही. कारण या सगळ्यावर आपलं आयुष्य नाही हे कधीच पक्कं झालं होतं. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मला खंबीर ठेवू लागली, माझ्या आसपासच्या वातावरणाचं विश्लेषण करून घडवू लागली ती म्हणजे वाचन.

जे मिळेल ते वाचायची ओढ लागली आणि त्यांनी जगाला चांगलं म्हणायला शिकवलं. अनेकदा या चांगलं म्हणण्यानं फसवणूकही केली पण १० वी झाल्यानंतर गुणांवर आपली लायकी सांगून जी घोर फसवणूक होत होती ती या प्रकारात मोडत नव्हती. वाचनामुळं लिहायला लागलो आणि लिहित गेलो.

आपलं लिहिलेलं कुणीतरी छापावं वाटायचं, पण ते कुठंच छापून येत नव्हतं. पण नापास प्रकरणानं एक मोठा आत्मविश्वास दिला होता. त्यामुळं काहीच फरक पडत नव्हता. कधी मधी वाचकांचा पत्रव्यवहार पेपरमध्ये छापून यायचा. कॉलेजात कधी तरी सूत्रसंचालन केलं की नाव छापून यायचं. तेवढंच सुख वाटायचं.

दहावीचा निकाल लागल्यावर मी नापास झाल्यानंतर जे पै पाहुणे, शेजारी पाजारी माझ्यावर हसत होते त्यांच्यासाठी हे छापून येणं त्रासदायक होतं. मग मी त्यांना बढाया मारून सांगायला लागलो की, माझं सगळीकडं छापतात. माझ्या ओळखी आहेत. मग ते या गोष्टीचा शोध घ्यायचे आणि त्यांना काही मागमूस लागत नव्हता.

हजार दरवाजे उघडतात

व्यवहारी जगात गुण, मार्क, चढता आलेख या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण ही एकच गोष्ट आपलं आयुष्य ठरवू शकत नाही हे मात्र नक्की. नापास झाल्यानंतर आपल्याला वाटत राहतं की, आपल्या भविष्याचे सगळे दरवाजे बंद झाले आहेत. या काळात आपल्या जवळचा असा कोणीतरी असतो की, तो सांगतो पुढचा दरवाजा बंद असला तरी तुझ्या आजुबाजूचे, मागचे हजार दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत. आपल्या आयुष्याचे मालक आपणच असतो.

ते कसं जगायचं हे आपल्या हातात असतं. पण आपला भवताल आपल्याला प्रभावित करत राहतो आणि ते अपरिहार्य आहे. ते कुणालाच चुकत नाही. आपल्या आसपासच्या सगळ्या या नकारात्मक गोष्टींना चुकवत आपण पुढे निघून आलो की आपल्याला आयुष्याचा हमरस्ता दिसायला लागतो. आपला हा रस्ताच आपले भविष्य असते. आपण काहीतरी करू शकतो हीच तुमची प्रेरणा असते. तुम्ही ये प्रेरणेने एक पाऊल टाकले तर तुम्हाला प्रेरणेचे हजारो शब्द आणि हात पुढे येतात.

Back to top button