

खानापूर : ऑनलाइन फसवणुकीतून मोठी रक्कम गमावल्याने आलेल्या नैराश्यातून बिडी (ता. खानापूर) येथील वृद्ध दांपत्याने जीवन संपवल्याची घटना 27 मार्च रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी नंदगड पोलिसांनी तपास करून चिराग जीवराजभाई लक्कड (रा. सुरत गुजरात) याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बिडी येथील दियागो संतान नजरत (83) आणि प्लावीया दियागो नजरत (78) या वृद्ध दांपत्याने फसवणुकीतून आत्महत्या केली होती. 27 मार्च रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरी प्लावीया यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन तर दियागो यांनी आधी पोटावर चाकूने वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण जीव न गेल्याने त्यांनी अखेर घरासमोरील टाकीत उडी घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी नंदगड पोलिसांनी ऑनलाइन फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला होता.
चिराग याने दियागो यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून आयडीएफसी बँकेतील बालाजी इंडस्ट्रीज नावाने असलेल्या खात्यात ऑनलाइनद्वारे सहा लाख दहा हजार रुपयाची रक्कम या बँक खात्याला लिंक असलेल्या स्वतः जवळील मोबाईलचा वापर करून वेगवेगळ्या बँक खात्यांना वर्ग केली होती. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.