

बंगळूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणुकीत आपला पराभव सावरकरांमुळे झाल्याचे पुस्तकात लिहिले आहे. पण, याविषयी भाजपकडून विनाकारण राजकारण केले जात आहे. काँग्रेसनेच त्यांचा पराभव केल्याचे सांगून अपप्रचार होत आहे, अशी टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात भाग घेऊन मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील मनुवादी नेते आंबेडकरांबाबत आता प्रेम दाखवत आहेत. घटना मंजूर झाल्यानंतर याच लोकांनी विरोध केला होता. 75 वर्षांपूर्वी घटना लागू केल्यानंतर आंबेडकरांनी ‘विरोध असणार्या लोकांच्यात आपण जात आहोत’ असे म्हटले होते. घटनेचे उद्दिष्ट विचारात घेतले तर असमानता, अस्पृश्यता दूर होणे गरजेचे आहे. जोपर्यंत जातीय व्यवस्था आहे, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण देशात आंध्र प्रदेशनंतर केवळ कर्नाटकाने टीएसपी आणि एससीपी कायदा जारी केला आहे. केंद्र सरकारला या समाजांबद्दल प्रेम, काळजी असेल, तर केंद्रानेही अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात आणण्याचे आव्हान त्यांनी दिले. राज्य सरकारने यंदा या समाजांच्या विकासासाठी 32 हजार कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. बढतीत आरक्षणासाठी संपूर्ण देशात प्रथमच कर्नाटकात कायदा तयार केला जात आहे. पण, भाजप नेते सामाजिक न्यायाविरुद्ध आहेत. राज्यघटनेला त्यांचा विरोध असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.
महिलांना, शोषितांना समान हक्क देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. स्वातंत्र्य, लोकशाहीसुद्धा समानतेचा संदेश देते. याकरिता सरकारने अनेक कार्यक्रम आखले आहेत. विविध साहित्य खरेदीसाठी लोकांकडे पैसा नसेल तर आर्थिक व्यवहारांवर परिणाम होतात. सध्या काही सुशिक्षितांकडून जातीभेद केला जातो. पण, आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतले तरी जातीयता नष्ट व्हावी. शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.
वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने मागासवर्गीय, अल्पसंख्याकांना कंत्राटामध्ये आरक्षण जाहीर केले आहे. आरक्षण हे मते मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. उच्च जातीतील लोकांबाबत द्वेषभावना असल्याचा आरोप काहीजण करत आहेत. पण, त्यामध्ये तथ्य नाही. आंबेडकरांच्या उद्देशानुसार शोषितांसाठी काम करत असल्याची माहितीही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत करण्यात वि. दा. सावरकर आणि एस. ए. डांगे यांचा हात होता, असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी केला. 18 जानेवारी 1952 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मित्राला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत खर्गेंनी हा दावा केला. यावेळी काँग्रेस अध्यक्षांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या भूमिकेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप सरकारवर टीकाही केली. तसेच जात जनगणना, आरक्षणाची मर्यादा हटवणे यांसह पाच मागण्या त्यांनी केंद्र सरकारकडे केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.