चिकोडी : पुढारी वृत्तसेवा
सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींवर लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एका शिक्षकाला चिकोडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहम्मद सादिक गौस मोहीदिन मियाबेग (वय 39) असे शिक्षकाचे नाव आहे. चिकोडी शहरातील एका सरकारी प्राथमिक शाळेत कार्यरत असलेला हा शिक्षक विद्यार्थिनींसोबत लैंगिक छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काल (शुक्रवार) सायंकाळी शाळेतून रडत घरी आलेल्या मुलींना पालकांनी विचारल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
सदर शिक्षकाने शाळेमध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलींनी या विषयी पालकांना सांगितले. इतर पालकांना याबद्दल माहिती दिल्यानंतर दहाहून अधिक विद्यार्थीनींवर लैंगिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे. या विषयी चिकोडी पोलिसांनी प्रकरण दाखल करून घेत सदर शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास सुरू असून, इतर पालक देखील तक्रार देण्यासाठी पुढे आल्याचे समजते. सध्या संशयित आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.