

बेळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या आरोपीला विशेष जिल्हा पोक्सो न्यायालयाने 30 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. शिवाप्पा भीमाप्पा त्यापी (वय 36, रा. आरगल ता. सौंदत्ती) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, शिवाप्पाने अल्पवयीन मुलीला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. मुलीच्या घराच्या मागील बाजूला दबा धरून बसून तिचे तोंड टॉवेलने बांधून तिला शेतात नेले. त्यानंतर जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. 11 नोव्हेंबर 2020 रोजी घडलेल्या या घटनेनंतर पीडित मुलीने पालकांना माहिती दिली. पालकांनी सौंदत्ती पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शिवाप्पावर कलम 376(2) व पोक्सो 4,6 अन्वये गुन्हा दाखल केला. तपास करुन जिल्हा पोक्सो न्यायालयत दोषारोपपत्र दाखल केले.
याप्रकरणी न्यायालयात एकूण 16 मुद्देमाल, 30 कागदपत्रे आणि 8 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात शिवाप्पा हा दोषी आढळल्याने न्या. सी. एम. पुष्पलता यांनी त्याला 30 वर्षांचा सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. पीडित मुलीला पाच लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाला दिले आहेत.