

गरीब जनतेला मिळणार मोफत उपचार
शेतकर्यांना प्रतिहेक्टर 21,500 भरपाई
राजकारणापेक्षा समाजकारणाकडे अधिक कल
बेळगाव : प्रत्येक समाजातील गोरगरीब जनतेमधील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे. शिक्षणामुळेच समाजामध्ये समानता निर्माण होऊ शकते. आर्थिक समानता ही तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी काँग्रेस सरकारने पंचहमी योजना सुरू करून यशस्वी केली. गरीब जनतेला सर्व प्रकारचे उपचार मोफत मिळावेत, यासाठीच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
शनिवार दि. 4 रोजी बिम्स आवारात उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षण महत्त्वाचे आहे. सर्वांना शिक्षण मिळाले तरच गरिबी हटणार आहे. देशाला आज स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली तरी गरिबी कमी झालेली नाही. प्रत्येक समाजात असमानाता वाढत आहे. ती असमानता दूर करण्यासाठी आम्ही पंचहमी योजना सुरू केल्या आहेत.
राज्यामध्ये यावर्षी अधिक पाऊस झाल्याने 10 लाख हेक्टर जमिनीमधील पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला. माळ जमिनीतील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना प्रतिहेक्टर 17 हजार तर सुपीक जमिनीतील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना प्रतिहेक्टर 21 हजार 500 रु. भरपाई दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील म्हणाले, बेळगावमध्ये सुपर स्पेशालटी हॉस्पिटल उभारल्यामुळे गोरगरीब जनतेला मोफत आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार मिळणार आहेत.
आम्ही राजकारणापेक्षा समाजकारणाकडे अधिक लक्ष देत असून प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगावच्या विकासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत आले आहे. आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एक मोठे पाउल आम्ही पुढे टाकले आहे, असे सांगितले. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यानींही विचार व्यक्त केले.
व्यासपीठावर आमदार राजू सेट, खासदार प्रियांका जारकीहोळी, केएलईचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, आमदार अशोक पट्टण, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार चन्नराज हट्टीहोळी, आ. राजू कागे, महांतेश कौजलगी, खासदार इरण्णा कडाडी, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, विनय नावलगट्टी यांच्यासह नेते व कार्यकर्ते उपस्थित होते
प्रारंभी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या हस्ते हास्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बिम्सचे मुख्य कार्यकारी संचालक अशोक शेट्टी यांनी स्वागत केले. डॉ. इराण्णा पल्लेद यांनी आभार मानले.
बेळगावमध्ये सरकारी कॅन्सर हॉस्पिटल उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. इमारत लवकरच पूर्ण केली जाईल. या ठिकाणी कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री शरणप्रकाश पाटील यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. आतापर्यंत काही जिल्ह्यात त्याची उभारणी करण्यात आली आहे. यापुढे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत राज्यात 22 वैद्यकीय महाविद्यालये असून त्याठिकाणी नीट च्या माध्यमातून गरीब, हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.