

बेळगाव : भाजपला भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. 40 टक्के कमिशन व भ्रष्टाचारामुळे लोकांनी भाजपला नाकारले आहे. त्यामुळे प्रथम भाजपने आपले घर स्वच्छ करावे, असा सल्ला विधान परिषद सदस्य नागराजू यादव यांनी दिला आहे. रविवारी ते बेळगावात पत्रकारांशी बोलत होते.
आ. यादव म्हणाले, भाजपमधून एका व्यक्तीला आधीच काढून टाकण्यात आले आहे. ते पुढे काय करतील याचा नेम नाही. देशात जर कोणता भ्रष्ट पक्ष असेल तर तो भाजप आहे. अबकारी विभागात भ्रष्टाचाराचे योग्य कागदपत्रे आढळल्यास, आम्ही मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तक्रार करून कारवाई करण्यास तयार आहोत. मी बूथ लेव्हलपासून काँग्रेस पक्षात वाढलो आहे. ते माझे घर आहे, कोणीही मला बाहेर ठेवू शकत नाही.
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी मला ओबीसी महामंडळ अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतला होता. मी आमदार असल्याने ते नाकारले. त्यांनी ते पद मधू बंगारप्पा यांना दिले. त्यावेळी मधू बंगारप्पा आमदार नव्हते. पण आता बंगारप्पा मंत्री आहेत. तेव्हा ते पद आता दुसर्याला देण्यात यावे, अशी मी मागणी केली आहे, अशीही माहिती आ. यादव यांनी दिली.
बेळगाव सीमावर्ती भागात अनेक मागास लोक आहे. खानापूरमध्ये वाघाने एका मुलीला पळवून नेले होते. ती घटना मला आजही आठवते. अशा समुदायांना अनुसूचित जातीच्या वर्गात समाविष्ट करण्याची आपली इच्छा आहे, असेही आ. नागराजू म्हणाले.