

बेळगाव : मराठी भाषिकांची काळ्या दिनाची फेरी होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन कार्यकर्त्यांवर दबाव घालत आहे; पण असे अनेक अन्याय पूर्वजांनी सहन केले आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना न घाबरता, प्रशासनाने परवानगी दिली नाही, तरी काळ्या दिनाची फेरी काढणारच, असा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी (दि. 26) रामलिंग खिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेसमध्ये बैठक झाली. अध्यक्षस्थानी समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे होते. यावेळी काळ्या दिनाच्या फेरीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सीमावासीयांचा लढा मोडीत काढण्यासाठी याआधी 80 च्या दशकात पोलिसांनी मराठी जनतेवर अत्याचार केला. नेत्यांवर खुनासारखे गुन्हे दाखल केले; पण त्यांनी माघार घेतली नाही. कार्यकर्त्यांच्या जिद्दीवर हा लढा सुरू आहे. आताही पोलिस मराठी जनतेवर अन्याय करत आहेत. दबाव घालत आहेत; पण अशा प्रकारांना घाबरायचे नाही. समितीच्या नेत्यांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अशाही परिस्थितीत रस्त्यात उतरून आपला विरोध दाखवावाच लागणार आहे. आम्ही काळ्या दिनाच्या फेरीसाठी अर्ज केला असून, प्रशासनाने परवानगी दिली नाही, तरी 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनाची फेरी निघणार आहे. त्यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश मरगाळे यांनी केले.
रणजित चव्हाण-पाटील यांनी काळ्यादिनाबाबत पंधरा दिवस आधी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करण्यात आलेला आहे. त्यांनी कोणताही निर्णय घेतला, तरी आमची फेरी निघणार आहे. उच्च न्यायालयाने आम्हाला आंदोलन करता येते, असा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. अॅड. अमर यळ्ळूरकर यांनी उच्च न्यायालयाने कोणाचाही आंदोलनाचा हक्क काढून घेता येत नाही, असे सांगितले आहे. त्याबरोबर प्रशासनाला आंदोलनात काही अनुचित प्रकार घडू नये, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे हा दुहेरी निर्णय असून आपण जबाबदारीने काळा दिन पाळला पाहिजेत, असे सांगितले.
सागर पाटील यांनी आपला लढा केंद्र सरकारविरोधात आहे, हे दाखवण्याची गरज आहे. त्यासाठी निषेध फेरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा वापरता येतील का, हेही पाहावे, अशा सूचना केल्या. युवा समितीचे श्रीकांत कदम, माजी नगरसेवक राजू बिर्जे, श्रीकांत मांडेकर, अनिल आमरोळे, रणजित हावळाण्णाचे, नेताजी जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला शिवराज पाटील, विकास कलघटगी, मदन बामणे, रमाकांत कोंडुसकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, प्रकाश नेसरकर, रमेश माळवी, बाबू कोले, संतोष कृष्णाचे आदी उपस्थित होते.
खासदार शेट्टर यांचा निषेध
मराठी मतांवर निवडून आलेले खासदार जगदीश शेट्टर यांनी काळ्या दिनाबाबत मराठीविरोधी भूमिका घेऊन लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांचा या बैठकीत निषेध करण्यात येत आहे, असा ठराव बैठकीत समंत करण्यात आला. याशिवाय राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या मागे लागून स्वाभिमान गहाण टाकू नका, असे आवाहनही करण्यात आले.