

खानापूर : गोवा सरकारने बेळगाव-पणजी मार्गावरील मोलेम तपासणी नाक्यावर स्वयंचलित वाहन कागदपत्र पडताळणी यंत्रणा मंगळवारपासून (दि. 7) कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली चेकपोस्टवरील वाहन पडताळणीच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना इथून पुढे स्वयंचलित कागदपत्र पडताळणी सक्तीची करण्यात आली आहे. सुरक्षित प्रवास आणि रस्ते अपघातांना पायबंद घालण्यासाठी ही योजना अंमलात आणण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात मोलेम नाक्यावर पहिली स्वयंचलित सीमा कागदपत्र पडताळणी सुरु झाली आहे. राज्य सरकार आणि मिस्टोटेक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील भागीदारीतून विकसित केलेली ही प्रणाली वाहन कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रिअल-टाइम डेटाबेस एकत्रीकरणाचा वापर करुन बनविली आहे. यांतर्गत पोलिस खात्याशी समन्वय साधून व्यापकपणे वाहन नोंदणी, विमा आणि प्रदूषण प्रमाणपत्रांची त्वरित पडताळणी केली जात आहे. ही यंत्रणा वाहन आणि चलन प्रणालींसह केंद्र सरकारच्या डेटाबेससह एकत्रितपणे काम करत आहे. यांतर्गत अन्य राज्यांतून गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची स्वयंचलित कागदपत्र पडताळणी केली जात आहे.
तीन प्रकारची तपासणी
प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. वाहन नोंदणी प्रमाणपत्राच्या वैध नोंदणी स्थितीची पडताळणी, तृतीय-पक्ष विम्याच्या सक्रिय विमा कव्हरची पुष्टी, नियंत्रणाखालील प्रदूषण (पीयूसी) प्रमाणपत्र व उत्सर्जन अनुपालनाची पडताळणी केली जात आहे.
अशी होणार तपासणी
वाहने तपासणी नाक्यातून गेल्यानंतर सिस्टम डेटाबेस इंटिग्रेशनद्वारे स्वयंचलितपणे या कागदपत्रांचे स्कॅन आणि पडताळणी होते. जर कोणतेही दस्तावेज अवैध किंवा कालबाह्य आढळले तर सिस्टम स्वयंचलित दंड (ई-चलन) निर्धारित करते. जे वाहन मालकांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पाठवण्याची सोय आहे. यामुळे पारदर्शक दंड प्रक्रिया निश्चित होऊन भ्रष्टाचाराला चाप बसणार आहे.