

बेळगाव : घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडल्याची घटना रविवारी रात्री कणबर्गी रोडवरील मालिनीनगरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेवेन्यू कॉलनीत उघडकीस आली. घरातील 15 तोळ्यांच्या दागिन्यासह 30 हजारांची रोख रक्कम पळवून नेल्याची नोंद माळमारुती पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत घरमालक बाळगौडा यांनी नोंदवलेली फिर्याद व माळमारुती पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, झारखंड येथे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र असल्याने बाळगौडा हे त्यांच्या पत्नीसह 7 ऑक्टोबर रोजी झारखंडला गेले होते. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी धारवाड येथे राहतो.
त्यांना मुलगी असून तिला रामतीर्थनगर येथील नातेवाईकांकडे सोडले होते. त्यामुळे घराला कुलूप लावले होते. हे कुटुंब जेव्हा रविवारी रात्री घराकडे गेले, तेव्हा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडल्याचे आढळून आले. आत जाऊन पाहिले असता बेडरूम मधील कपाटातील सुमारे 15 तोळ्यांचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने व तीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याचे आढळून आले. या प्रकरणाची माहिती त्यांनी माळमारुती पोलिसांना कळवली.
माळमारुती ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीशैल होळीगेर यांनीवसोमवारी सकाळी सहकाऱ्यांसह रेवेन्यू कॉलनीला भेट देऊन पाहणी केली. श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी नोंद करून घेत निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत.