

बेळगाव : संततधार पावसाने राहत्या घराची भिंत कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी (दि. 30) मध्यरात्री कुद्रेमानीतील जीवननगर परिसरात घडली. सुदैवानेच या घटनेत जीवितहानी झाली नाही.
कुद्रेमानी परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. येथील सखूबाई गोपाळ पन्हाळकर यांच्या घराची पश्चिमेकडील संपूर्ण भिंत मध्यरात्री कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सखूबाई यांचे कौलारु घर माती व विटांनी बांधलेले पारंपरिक स्वरुपाचे आहे. सततच्या पावसामुळे भिंतीला तडे गेले होते.
दुर्घटनेच्या रात्री सखूबाई यांचा मुलगा एकटाच घरात झोपलेला होता. तर सखूबाई या शेजारी राहणार्या नातलगांकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे, मोठा अनर्थ टळला.
दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्य, कपडे, अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सखूबाई या विधवा आहेत. तलाठी, ग्रा. पं. पीडीओ यांनी पडलेल्या घराची पाहणी करुन भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.