

बेळगाव : सिग्नलजवळून रस्ता ओलांडताना ट्रक अंगावरून गेल्याने वृद्ध जागीच ठार झाला. मंगळवारी (दि. 28) सकाळी साडेदहाच्या सुमारास कोल्हापूर सर्कलजवळ हा अपघात घडला. याप्रकरणी ट्रक ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मृत वृद्धाची अद्याप ओळख पटली नसून रात्री उशिरापर्यंत ओळख पटविणे सुरू होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी : ट्रकचालक अरविंद रामा जाधव (मूळ रा. शिराळा, जि. सांगली, सध्या रा. कारदगा, ता. चिकोडी) चन्नम्मा सर्कलकडून केएलईकडे निघाला होता. कोल्हापूर सर्कलजवळ सिग्नल पडल्याने ट्रक थांबला होता. यावेळी ट्रकसमोरून 60 ते 65 वयाचे वृद्ध रस्ता पार करत होते. परंतु, सिग्नल हिरवा झाल्याचे पाहून अचानक ट्रक हलविला. यावेळी ट्रकसमोरून निघालेल्या वृद्धाच्या अंगावरून पुढील व मागील चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. याप्रकरणी ट्रकचालक बलराम ऊर्फ बाळू देमानी कणबरकर (रा. निपाणी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांत नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी तपास करीत आहेत.