

बेळगाव : खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, घरफोड्या आणि साक्षीदारांना धमकावणे इत्यादी गुन्ह्यांमधील संशयित, गोवा आणि महाराष्ट्रामध्येही गुन्हेगारी कारवायांमध्येही सहभागी असलेला अंधा सलीम ऊर्फ सलीम कमरुद्दीन सौदागर (रा. बागवान गल्ली, बेळगाव) याला बेळगाव पोलिसांनी अटक केली. त्याला नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्तालयाने राज्य पोलिस प्राधिकरणाकडे गुन्ह्यांचा अहवाल पाठवला होता. त्याची दखल घेत राज्य प्राधिकरणाने त्याला नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर बेळगाव पोलिसांनी अटक वॉरंट जारी करून त्याला अटक केली.
बेळगाव आयुक्त कार्यालयाकडून अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. या सराईत गुन्हेगारावर अमली पदार्थांचे गुन्हे, मालमत्तासंदर्भात धमकी देण्याचे 21 गुन्हे, एक खून, दोघांवर खुनी हल्ला, एक चोरी असे एकूण 37 गुन्हे दाखल होते. पैकी 26 गुन्ह्यांतून त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे, तर आणखी 5 गुन्ह्यांत त्याला शिक्षा झाली होती; मात्र तो जामिनावर बाहेर होता. खुनाचा प्रयत्न, साक्षीदाराला धमकी देणे यांसह एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी पीआयटी-एनडीपीएस -1988 (सुधारणा) कायदा 3(1) च्या कलम 3(1) अंतर्गत अटक वॉरंट जारी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता. त्यानंतर कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार 27 ऑक्टोबर रोजी सलीम ऊर्फ अंधा सलीम सौदागरला बेळगाव येथील मध्यवर्ती कारागृहात नजर कैदेत ठेवण्यात यावे, असे अटक वॉरंट जारी केले. त्यानंतर त्याला अटक झाली आहे. बेळगाव पोलिस आयुक्तालयाकडून अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई झालेली आहे.