

बेळगाव : शहरातील ब्लॅकस्पॉट हटवण्यासाठी, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी, स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतील तंत्रज्ञानाचा वापर करा, अशा सूचना केंद्रीय पथकाने बुधवारी (दि. 2) केल्या.
गेल्या तीन दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी पाहणी करणार्या नवी दिल्ली येथील स्मार्ट सिटीज 2.0 च्या केंद्रीय पथकाचा दौरा बुधवारी समाप्त झाला. या दौर्यात त्यांनी शहरात महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेकडून स्वच्छतेबाबत राबवलेल्या उपक्रमांची पाहणी केली. सिटीज 2.0 मध्ये बेळगावला 135 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी स्वच्छतेच्या कामावर वापण्यात येणार आहे. त्यामुळे, बुधवारी त्यांनी स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंंटरमध्ये स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकार्यांची बैठक घेतली.
यावेळी त्यांनी शहरातील कचर्याचे ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी कॅमेर्यांचा वापर करावा. ठिकठिकाणी स्पीकर्सद्वारे स्वच्छतेबाबत जागृती करण्यात यावी. डिस्प्ले बोर्डवरुन कचर्याची वर्गवारी आणि स्वच्छतेबाबत माहिती देण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या. या बैठकीला स्मार्ट सिटी योजनेच्या व्यवस्थापकीय संचालिका सईदा आफ्रिनबानू बळ्ळारी, साहाय्यक अभियंता कांचन मलगार आदी उपस्थित होते.