बेळगाव : तीस फूट उंच रथावर बसवलेला ५ किलो वजनाचा चांदीचा मोर डोक्यात पडून तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सौंदत्ती तालुक्यातील चचडी येथे सोमवारी (दि.२६) सायंकाळी घडली. शिवानंद राजकुमार सावळगी (१३) असे मृत बालकाचे नाव आहे.
चचडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यानिमित्त भगवान संगमेश्वराच्या रथोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती. यावर्षी पहिल्यांदाच रथावर ५ किलो वजनाचा चांदीचा मोर बसवण्यात आला होता. ज्या रस्त्यावरून ही मिरवणूक निघणार होती. त्या रस्त्यावर बरेच खड्डे होते. दोन्ही बाजूंना दोर लावून रथ पुढे ओढला जात होता. एका ठिकाणी खड्ड्यात रथाचे चाक अडकले. यावेळी हिसका मारून भाविकांनी रथ ओढण्याचा प्रयत्न केला असता रथावर बसवलेला चांदीचा मोर बाजूने चाललेल्या एका बालकाच्या डोक्यात पडल्याने या बालकाचा जागीच मृत्यू झाला. रथोत्सव मिरवणुकीत असा अनर्थ घडल्याने मिरवणूक तेथेच थांबवण्यात आली. सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.