बेळगाव : दिवाळीच्या पूर्वसंध्येला रविवारी बाजारपेठेत विक्रमी गर्दी झाली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी रविवारी (दि. २७) खरेदीचा 'सुपर संडे' अनुभवला. मध्यवर्ती बाजारपेठेसह शहरात वाहतूक कोंडी झाली होती. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत लोकांची गर्दी होती.
दिवाळीनिमित्त कपडे, आकाशकंदील, उटणे, सुगंधीत द्रवे आणि इतर साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रहदारी पोलिसांकडून रविवारपासून बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर बॅरिकेडस् लावून चार चाकी आणि ऑटो रिक्षांना प्रवेश बंदी करण्यात केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली. पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने बेळगावसह गोवा आणि चंदगड परिसरातून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांकडून फिश मार्केट ते यंदे खुटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग केले जात आहे. लांबलेल्या पावसाने माघार घेतली असल्यामुळे आणि आठवडा सुट्टी असल्यामुळे सोमवारी (दि. २८) वसुबारस असून, दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेकांनी रविवारीच खरेदी केली. शहरात या ठिकाणी गर्दी गेल्या चार दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. बेळगावसह गोवा आणि चंदगड परिसरातील लोक खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे समादेवी गल्ली, खडेबाजार, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, भेंडी बाजार, मध्यवर्ती बस स्थानक, किर्लोस्कर रोड, नरगुंदकर भावे चौक, रविवार पेठ, देशपांडे गल्ली या प्रमुख गल्ल्यांमध्ये लोकांची मोठी वर्दळ असून वाहतूक कोंडी होत आहे.
रिक्षा, कारला प्रवेशबंदी वाहन चालक जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करत असल्याने पादचाऱ्यांनादेखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बाजारपेठेत मोटारसायकल वगळता ऑटो रिक्षा आणि चार चाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. काकती वेस, यंदेखुट, अंबाभुवन, किर्लोस्कर रोड, रविवार पेठ आदी ठिकाणच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी रहदारी पोलिसांकडून वाहने पुढे वळविली जात आहेत. त्यातच आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली होती. चार चाकी वाहने फिश मार्केट ते यंदे खुटपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा पार्क करण्यात आली होती. सणासुदीच्या तोंडावर गर्दी होत असल्याने रहदारी पोलिसांनीदेखील कारवाईत काही प्रमाणात सूट दिल्याचे यावेळी दिसून आले.