बेळगाव : उचगावच्या मुख्य चौकात संगोळ्ळी रायण्णांचा पुतळा उभारावा, अशी मागणी करत बाहेरगावच्या काही कन्नड संघटना भाषिक वाद निर्माण करत गावातील वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत आहेत. उचगाव येथे संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा मुख्य चौकातच बसवण्यात यावा, अशी मागणी पुन्हा या संघटनांनी केली असून, त्यामुळे गावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यामुळे गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे धाव घेतली असून, संघटनांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
उचगावमध्ये सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र बाहेरगावच्या काही कन्नड संघटना गावातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. जातीयवाद आणि भाषावाद निर्माण करून गावाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. उचगावमध्ये संगोळ्ळी रायण्णाांचा पुतळा व फलक बसवण्यात यावा, अशा मागण्या ते करत आहेत. हा पुतळा मुख्य चौकातच बसवला जावा, अशी मागणी आहे. मात्र मुख्य चौकात फक्त छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल, असा ठराव गावाने सर्वांनुमते केला आहे. तरीही संघटना आता आगंतुकपणा करत असून, त्यामुळे उचगावात संतापाची लाट पसरलेली आहे. या संघटनांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उचगाव ग्राम पंचायतीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे करण्यात आली. अशाच आशयाचे निवेदन पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनाही देण्यात आले.
ग्रामपंचायतअध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सदस्य एल.डी. चौगुले, यादो कांबळे, गजानन नाईक, हनुमंत बुवा, दत्ता बेनके, जावेद जमादार, बंटी पावशे, शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.