बेळगावातील ६१ मराठी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - पुढारी

बेळगावातील ६१ मराठी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन करणार्‍या मराठी युवकांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून कर्नाटक सरकारने तुघलकी कारभाराचा नमुना पेश केला आहे. सीमाभागातील मराठी तरुणांना लक्ष्य करून त्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न झाला आहे.

17 डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी चौकात मराठी नेते आणि कार्यकर्त्यांनी बंगळूर येथे झालेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात आंदोलन करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या दरम्यान अज्ञातांनी काही ठिकाणी दगडफेक केली. पण, या प्रकरणात आंदोलनात सहभागी असलेल्या तरुणांना गोवण्यात आले.

मराठी नेत्यांना टार्गेट करण्यात आले. रातोरात 27 जणांना घरातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोन दिवस अटकसत्र राबवून 11 जणांना ताब्यात घेतले. एकूण 38 जणांवर मार्केट, खडेबाजार आणि कॅम्प पोलिसांत सात गुन्हे नोंदवले असून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

आंदोलकांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुस्कर, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, अंकुश केसरकर या अटकेत असलेल्या 38 जणांवर आणि भूमिगत असलेल्या 23 जणांवर गुन्हा नोंदवला आहे.

पुन्हा पोलिसांकडून ताबा

कारागृहात असलेल्या 38 मराठी युवकांना मार्केट पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले. जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. न्यायालयात वकिलांनी 38 जणांची बाजू मांडली. पण, त्यांच्यावर आणखी एका गुन्ह्याची नोंद झाल्यामुळे जामिनाची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली.

युवकांना धमकावले

मराठी युवकांना पोलिसांकडून धमकावण्यात येत असून पोलिस ठाण्यात नेऊन भूमिगत युवकांची माहिती विचारली जात आहेत. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर पोलिसांविरोधात का लिखाण करत आहात, असे विचारले जात आहे. अजून काही युवकांना ताब्यात घेण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

Back to top button