बेळगाव : विटंबना करणार्‍यांवर ‘देशद्रोह’ | पुढारी

बेळगाव : विटंबना करणार्‍यांवर ‘देशद्रोह’

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करणार्‍या दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणायची का, याची कायदेशीर शहानिशा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी विधानसभेत देत समितीवर आगपाखड केली.

अनगोळमध्ये संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आधार घेत सोमवारी विधानसभेत सर्वपक्षीय आमदार, मंत्र्यांनी म. ए. समितीविरोधात गरळ ओकली. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणावी, अशी मागणी अनेकांनी लावून धरली.

महाराष्ट्रात लाल-पिवळा ध्वज जाळल्याप्रकरणी आणि सध्या झालेल्या संगोळी रायण्णा पुतळ्याच्या विटंबनेबाबत महत्त्वाची चर्चा सभागृहात झाली. चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे देशासाठीचे योगदान नव्याने सांगण्याची गरज नाही. पण, सातत्याने कन्नड लोकांचा अवमान करणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

राज्याची गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरत असल्यामुळे गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी. काही गुंडांना तडीपार करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असेही सिद्धरामय्या म्हणाले. वारंवार अपमान करणार्‍या म. ए. समितीवर बंदी घालताना कायद्याच्या चौकटीत काय करता येईल ते सर्वांनी पाहावे, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा म्हणाले, भाषेच्या नावावर राजकारण करून लोकांना भडकावणार्‍यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. दोषींवर कोणतीही दयामाया दाखविण्यात येऊ नये. कन्‍नडसाठी आम्ही सर्वजण एक आहोत, हे दाखविण्याची वेळ आली आहे.

आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ म्हणाले, विटंबना मोठे षड्यंत्र आहे. याची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. केवळ मराठी-कन्‍नड वाद वाढविण्याचा हा प्रयत्न नसून संपूर्ण देशात वाद निर्माण करण्याचा प्रकार आहे.

काँग्रेस आमदार एच. के. पाटील म्हणाले, सुवर्णसौधला असलेल्या चार दरवाजांपैकी एकाला संगोळ्ळी रायण्णा यांचे नाव देण्यात यावे. त्यांचा पुतळा उभारण्यात यावा.

दिवसभर समितीच्या नावे शिमगा

विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावे शिमगा करण्यात आला. म. ए. समितीमुळे बेळगावातील वातावरण बिघडले असून कन्‍नडिगांवर हल्‍ले करण्यात येत आहेत, असा आरोप अनेक आमदारांकडून करण्यात आला.

आमदार पी. राजू यांनी समितीवर कठोर कारवाईची मागणी केली. समिती कार्यकर्त्यांवर गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करून वचक बसवावा. आता कारवाई केली तर पुढे हे लोक डोके वर काढणार नाहीत, अशी धमकीवजा सूचना त्यांनी मांडली, तर सर्वच आमदारांनी समितीविरोधात गरळ ओकली.

चंद्र-सूर्य असेपर्यंत इंचही जमीन देणार नाही : मुख्यमंत्र्यांची दर्पोक्‍ती

बेळगाव हे कर्नाटकचे आणखी एक महत्त्वाचे शक्तिकेंद्र बनले आहे. सूर्य-चंद्र असेपर्यंत येथील एक इंचही जमीन कोणत्याही राज्याला देणार नाही आणि कोणाशी त्याबाबत चर्चाही करणार नाही, अशी दर्पोक्ती करतानाच महाराष्ट्रातील कन्नडिगांचे संरक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. महाराष्ट्रात लाल-पिवळा ध्वज जाळल्याप्रकरणी तेथील पोलिस अधिकार्‍यांशी आम्ही चर्चा केली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशीही बोलणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांचा गुन्हेगारी ट्रॅक तपासून गुंडा कायद्याखाली कारवाई करण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. केवळ अटक करून जामिनावर सोडण्याचे काम आता होणार नाही. बंगळूर, बेळगाव आणि खानापूर (हलशी) येथील घटनांची सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सुवर्णसौधसमोर संगोळ्ळी रायण्णा, राणी चन्‍नम्मा यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

म्हणे समिती पळपुटी

ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्‍वराप्पा म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समिती नव्हे तर ही महाराष्ट्र पळपुटी समिती आहे. रात्रीच्या अंधारात संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना करतात, हिंमत असेल तर त्यांनी दिवसा येऊन दाखवावे. त्यामुळे अशा लोकांना आमच्या राज्यात ठेवता कामा नये. या देशद्रोह्यांना तडीपार करण्यात यावे.

बेळगावातून आणखी सहा मराठी युवकांना अटक

बेळगाव : शहरात उद्भवलेल्या तणावप्रकरणी सोमवारी आणखी 6 संशयितांना मार्केट पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेल्यांची संख्या 38 झाली आहे. पोलिसांनी तीन दिवसांपासून धरपकड मोहीम सुरू केली आहे. खुनी हल्ला केल्याचा ठपका अनेक तरुणांवर ठेवत अटकसत्र सुरू केले आहे. यामुळे सीमावासीयांतून संताप व्यक्त केला जात आहे.

Back to top button