बेळगाव : खानापूर तालुक्यात अवकाळी ने भात पीक भुईसपाट | पुढारी

बेळगाव : खानापूर तालुक्यात अवकाळी ने भात पीक भुईसपाट

खानापूर (जि. बेळगाव) : वासुदेव चौगुले

मंगळवारी रात्री झालेल्या धुवाधार अवकाळी पावसामुळे हाता तोंडाला आलेले भात पीक भुईसपाट झाले आहे. अनेक ठिकाणी कापलेले भात पीक नदी, नाले आणि ओढ्यात वाहून गेल्याने बळीराजाला वर्षभराच्या मेहनतीवर पाणी सोडावे लागले आहे. भात पीक आणि चिखल एकच झाल्याने आज दिवसभर मिळेल तेवढे पिक घरी नेऊन लावण्यासाठी शेतकऱ्याची कुटुंबियांसोबत केविलवाणी धडपड शिवारात सुरू आहे.

खानापूर तालुक्यात ३२ हजार हेक्‍टरवर भात लागवडीचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक भात उत्पन्नाचा तालुका म्हणून खानापूरची ओळख आहे. यावर्षी भात पिकही तरारून आले होते. त्यामुळे शेतकऱ्याला समाधानकारक उत्पन्नाची आशा लागून होती. तथापि गेल्या आठ दिवसांपासून धास्ती निर्माण केलेल्या अवकाळी पावसाने अखेर मंगळवारी डाव साधला. सायंकाळी सात वाजल्यापासून तुफान पावसाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे तालुक्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर सर्वच भागाला पावसाने झोडपून काढले. एकही शेतकरी पावसाच्या तडाख्यातून सुटू शकला नाही.

कमी-अधिक फरकाने सर्वच शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ऐन सुगीत धान्यरुपाने घरी लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करणाऱ्या शेतकऱ्याला वर्षभराच्या दोन घासाची भ्रांत लागून राहिली आहे.

करंबळ, जळगे, हलकर्णी, हत्तरगुंजी, इदलहोंड, गर्लगुंजी, चापगाव, शिंदोळी, गुंजी, जांबोटी, शिरोली, माणिकवाडी, सावरगाळी, नंदगड, हेब्बाळ, मणतुर्गा, हलगा, मेरडा, बिडी, कक्केरी, भुरुणकी, नागरगाळी, लोंढा या भागातील शेतकऱ्यांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला आहे. यंदा ओला दुष्काळ जाहीर करून भात उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

Back to top button