हलगा-मच्छे बायपास : निर्दयी प्रशासनाविरोधात एल्गार | पुढारी

हलगा-मच्छे बायपास : निर्दयी प्रशासनाविरोधात एल्गार

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : हलगा-मच्छे बायपास ला विरोध करीत गुरुवारी शेतकरी आक्रमक झाले. न्यायालयीन स्थगिती असतानाही सरकारी यंत्रणेने पोलिस बळाचा वापर करीत उभ्या पिकावर जेसीबी फिरवला. त्यामुळे एका तरुण शेतकर्‍याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. शेतकर्‍यांना फरफटत नेताना महिलांच्या अंगावरील साडी व ब्लाऊज फाटले. परंतु, निर्दयी पोलिस प्रशासनाला याचे काहीच वाटले नाही.

हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी दोन दिवसांपासून पुन्हा काम हाती घेतले आहे. परंतु, बुधवारपासून शेतकर्‍यांनी तीव्र आंदोलन करीत याला विरोध केला आहे. न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही बायपास रस्त्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आक्रमक बनलेल्या शेतकर्‍यांनी बुधवारी कंत्राटदाराला पिटाळून लावले. शिवाय आपला विरोध दर्शवत प्रादेशिक आयुक्‍त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलिस आयुक्‍तांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. असे असताना जिल्हा प्रशानसनाने शेतकर्‍यांच्या मागणीला न जुमानता दडपशाहीची भूमिका घेतली.

आत्मदहनाचा प्रयत्न

गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून मच्छे येथून बायपास रस्त्याच्या सपाटीकरणाला सुरुवात झाली. मच्छे येथील शेतकरी अनगोळकर यांच्या तोडणीला आलेल्या ऊस पिकावर जीसीबी चालविला. हे पाहून शेतकरी आकाश अनिल अनगोळकर (वय 22 रा. मच्छे) याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत आकाश सुमारे 40 टक्के भाजला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा भाऊ अमित अनगोळकर यानेही आंदोलन स्थळावरील झाडावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी समजावल्यानंतर तो खाली आला.

निर्दयी पोलिसांची क्रूरता

शेतकर्‍यांचा वाढता विरोध पाहून प्रशासनाने पोलिस बळाचा वापर करीत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. जेसीबीसमोर गेलेल्या शेतकर्‍यांना पोलिसांच्या सहायाने बाजूला करीत उभ्या ऊस पिकावर जेसीबी चालविला. यावेळी महिला शेतकरीही तीव्र विरोध करीत होत्या. परंतु, त्यांना येथून जबरदस्तीने उचलून वाहनांमध्ये कोंबण्यात येत होते. यावेळी अनेक महिलांच्या साड्या व ब्लाऊज फाटले. परंतु, पोलिसांना याची जराही फिकीर नव्हती. 15 पेक्षा अधिक शेतकर्‍यांना अटक करण्यात आली. महिला व पुरूष शेतकर्‍यांना फरफटत नेऊन पोलिस वाहनात कोंबले जात होते.

आमचे फक्‍त संरक्षण

येथे बंदोबस्ताच्या ठिकाणी उपस्थित असलेले कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी शेतकर्‍यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर सर्व शेतकर्‍यांना वाहनात घातले. हे काम बंद होणार का सुरूच राहणार? याबाबत डॉ. आमटे यांनी आपले काम येथे संरक्षण देणे आहे. काम बंद राहणार की सुरू, हा निर्णय प्रशासनाचा असल्याचे सांगितले.

प्रशासन-शेतकर्‍यांची बैठक?

बायपासला शेतकर्‍यांचा वाढता विरोध पाहता प्रशासनाने शेतकर्‍यांची बैठक घेण्याचा विचार सुरू केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. परंतु, ही बैठक घेणार की, दमदाटी व जबरदस्ती करीत येथील काम सुरूच ठेवणार, हे अद्याप समजलेले नाही.

अटकेनंतर पुन्हा काम सुरू

सर्व शेतकर्‍यांना अटक करताना आम्ही काम थांबवतो, असे येथील प्रशासकीय अधिकारी सांगत होते. परंतु, शेतकर्‍यांना वाहनात घालताच पुन्हा काम सुरू करण्यात आले. पोलिसी बळाचा वापर करून होणार्‍या या प्रशासकीय अन्यायाचा शेतकर्‍यांनी तीव्र निषेध नोंदविला.

Back to top button