सिंदगी व हनगल विधानसभा : भाजपचा निजदला, काँग्रेसचा भाजपला धक्‍का | पुढारी

सिंदगी व हनगल विधानसभा : भाजपचा निजदला, काँग्रेसचा भाजपला धक्‍का

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेेल्या सिंदगी व हनगल विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. सिंदगीची धजदकडे असलेली जागा भाजपने मिळवली. तर, हनगलमध्ये भाजपकडे असलेली जागा काँग्रेसने मिळविली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हावेरी जिल्ह्यातील हनगलची जागा काँग्रेसकडे गेल्याने भाजपला हा धक्‍का मानला जात आहे.

हनगल विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने 7 हजार 426 मतांनी तर सिंदगीत भाजपने 31 हजार 88 मतांनी विजय मिळवले. सिंदगी मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार अशोक मनगुळी यांनी 62,292 मते घेतली.

भाजप उमेदवार रमेश भुसनूर यांनी 93,380 मते घेऊन विजय मिळवला. निजदच्या नाजिया अंगडी यांनी 4321, कर्नाटक राष्ट्रीय समितीचे डॉ. सुनीलकुमार हेब्बी यांनी 916, अपक्ष उमेदवार जिलानी मुल्‍ला 505, दीपक एस. 409 आणि 1029 मते नोटाला पडली.

हनगलमध्ये काँग्रेस उमेदवार श्रीनिवास माने यांनी 87,300 मते तर भाजप उमेदवाराने 79,874 मते मिळवली. निजदच्या निजदचे नियाज शेख यांनी 923 मते मिळवली. कर्नाटक राष्ट्रीय समितीचे उद्देचप्पा उद्दानकल 583, राष्ट्रीय भारत पार्टीचे फकिरगौडा गजीगौडर 105, लोकशक्‍ती तलवार 65, अपक्ष उमेदवार उमेश कृष्णप्पा यांनी 45 मते मिळवली.

सिंदगी व हनगल विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. पण निजदला घोर निराशेला सामोरे जावे लागले. दोन्ही मतदारसंघांमध्ये निजदचा पराभव झाला. या पक्षाने दोन्ही ठिकाणी अल्पसंख्याक उमेदवाराला संधी दिली होती. पण, त्यांचा हा हिशोब चुकला.

सिद्धरामय्यांनाही असा अनुभव आला होता : मुख्यमंत्री

सिंदगीमध्ये भाजप उमेदवाराला विजय मिळाला. हनगलमध्ये जागा गमवावी लागली. माजी मंत्री दिवंगत सी. एम. उदासी यांनी अनेक कामे केली. ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र, पोटनिवडणुकीत जनतेचा पाठिंबा मिळवण्यात अपयश आले. काँग्रेस उमेदवाराने गेल्या दोन-तीन वर्षांत केलेल्या कार्याला मतदारांनी पसंती दिल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

त्यामुळे भाजपला धक्‍का बसला असे राजकीय विश्‍लेषण करणे सोपे आहे. याआधी सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदी असताना असाच निकाल लागला होता. हा पराभव मान्य आहे. भाजप कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. यावर चिंतन करून आता पुढील निवडणुकीची तयारी केली जाईल, असे ते म्हणाले.

हा निकाल पाहता राज्यातील जनतेला बदल हवा असल्याचे स्पष्ट होते. हनगलमधील भाजपची जागा काँग्रेसने पटकावली आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत सर्व वर्गांचे प्रतिनिधित्व करणार्‍या काँग्रेसला बहुमत मिळेल. पोटनिवडणूक निकालावरून सत्ताधार्‍यांना जनतेने इशारा दिला आहे. – डी. के. शिवकुमार प्रदेशाध्यक्ष, कर्नाटक काँग्रेस समिती

हनगलमधील निवडणूक निकाल अनपेक्षित आहे. या निकालाचा सर्व बाजूंनी अभ्यास करण्याची गरज आहे. यावर चिंतन केले जाईल. सिंदगीमध्ये भुसनूर यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळवली. निकालाबाबत चिंतन केले जाईल.
– बी. एस. येडियुराप्पा माजी मुख्यमंत्री

Back to top button