कन्‍नड गायन कार्यक्रम : आता कोणावर गुन्हा होणार? | पुढारी

कन्‍नड गायन कार्यक्रम : आता कोणावर गुन्हा होणार?

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठी कागदपत्रांची मागणी करत मोर्चा काढल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांसह 200 जणांवर गुन्हा दाखल केला. आता कन्‍नड गायन कार्यक्रम मध्ये खुद्द जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दोन हजार लोकांना एकत्र केले. या विरोधात कधी गुन्हा दाखल होणार, असा सवाल मराठी जनतेतून जिल्हाधिकार्‍यांना करण्यात येत आहे.

आपल्या न्याय्य हक्‍कांसाठी मोर्चा व आंदोलन करणार्‍या मराठी भाषिक नागरिकांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करणार्‍या जिल्हा प्रशासनाने आता कोरोना नियम बासनात गुंडाळून ठेवले आहेत का, असा प्रश्‍न गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मोर्चा काढल्यामुळे कोरोना नियमावलींचे उल्लंघन केले म्हणून 200 मराठी भाषिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गुरुवारी सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुवर्णसौधच्या पायर्‍यांवर जाहीर कन्‍नड गीते गाण्याचा कार्यक्रम झाला. हा विरोधाभास कशासाठी, आता कोरोना नियम नाहीत का, असा प्रश्‍न पुन्हा एकदा गंभीर बनला असून याची दखल केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि मानव हक्‍क आयोगानेही घ्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

यासंदर्भात ट्विटरवर मोहीम राबविण्यात येत असून ट्विटर मोहिमेच्या माध्यमातून कर्नाटकच्या बेळगाव जिल्हा प्रशासनाचा दुजाभाव, मराठी माणसाला पाण्यात बघण्याची परिस्थिती आणि ‘हम करे सो कायदा’ यासंदर्भात चर्चा होऊ लागली आहे. सुवर्णसौधच्या पायर्‍यांवर कन्‍नड गीते गाण्याचा कार्यक्रम झाला.

यावेळी हजारहून अधिक विद्यार्थी दाटीवाटीने एकमेकाला चिकटून उभे होते. जिल्हाधिकारी हिरेमठ यांच्यासह कोणीही मास्क वापरले नव्हते. अशा परिस्थितीत कोरोना नियमांचे पालन केले गेले का, असा प्रश्‍न सध्या लोकांतून उपस्थित होत आहे. सरकारच्या बेळगाव जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या नियमांचा आधार घेऊन मराठी माणसांवर गुन्हे दाखल केले.

मग आता जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियम भंगाबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल कोण करणार? स्वतः जिल्हाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते. खा. मंगला अंगडी, जिल्हाशिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिकही यावेळी उपस्थित होते. त्यांनी कोरोना नियमावलींचे उल्‍लघंन केले आहे. त्यामुळे नैतिकेच्या आधारावर यावर जिल्हाधिकारी स्पष्टीकरण देणार का, असा सवाल उपस्थित होतो.

मराठीला नेहमीच दुजाभाव

मराठीतून कागदपत्रांसाठी आयोजित मोर्चा होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रयत्न केला. मोर्चा दिवशी तो अडवून पोलिसांनी दबाव घातला. पण, तरीही मोर्चा झाल्यामुळे अनेकांना पोटशूळ उठला आहेच. त्यामुळे राज्यकर्त्यांकडून टाहो फोडण्यात येत आहे. आता चक्‍क जिल्हाधिकारी आणि खासदारच हजारो लोकांना जमा करून कन्‍नड गायन कार्यक्रम करत आहेत. त्यांच्यावर कोणीच कारवाई करत नाही. यातून मराठी भाषिकांवरील दुजाभाव दिसून येतो.

Back to top button