निपाणी, मधुकर पाटील : निपाणीच्या बस स्थानकावर छोट्याशा गाड्यावर वडापाव विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या दयानंद सावंत यांची मुलगी रेणुका सावंत हिने दहावीच्या परिक्षेत ९७ टक्के गुण मिळवले आहेत. अर्जुननगर ( ता.कागल ) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या शुक्रवारी लागलेल्या निकालात तिने ९७ टक्के गुण घेऊन केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे रोजंदारी करणाऱ्या आईला घरकामात मदत करीत तिने हे लख्ख यश मिळवली आहे. तिच्या यशाने आई वडिलासह रासाई शेंडुर (ता. निपाणी) गाव देखील भारावले असून आपण वैद्यकीय क्षेत्रात करियर करणार असल्याचे मत रेणुका हिने यावेळी बोलताना व्यक्त केले.
मुलगा मुलगी भेदभाव करणाऱ्या समाजात त्यांनी मुलींना उच्चशिक्षित करण्यासाठी तन-मन-धन अर्पून सातत्याने अपार कष्टाची तयारी ठेवली आहे. त्यांच्या या कष्टाला यशाचा सुगंध रेणुका हिने दिला आहे. काही वर्षांपूर्वी कामधंद्याच्या निमित्ताने सावंत हे कुटुंबासह मुंबई येथे स्थायिक होते. कालांतराने 2017 साली त्यांनी मुंबई सोडून निपाणी गाठली. त्यांना दोन मुलीच असून त्यांच्या शिक्षणासह आपल्या व्यवसायासाच्या निमित्ताने येथील संभाजीनगरात भाड्याने घर घेतले. त्यानंतर येथील बस स्थानकासमोर खाद्यपदार्थाचा छोटासा गाडा टाकून वडापाव,भजी, पुलावा असे पदार्थ तयार करून त्याची विक्री करीत आहेत.
रेणुका ही लहानपणापासूनच हुशार विद्यार्थीनी म्हणून परीक्षेत आहे. घरच्या परिस्थितीची जाण ठेवून जिद्द चिकाटीच्या जोरावर तिने घरातील छोटी मोठी कामे करत दहावीच्या पहिल्या सत्रापासूनच अभ्यासावर जोर दिला. त्याला विद्यालयाचे शिक्षकांनीही चांगली साथ दिली. त्यामुळेच तिने दहावी परीक्षेत लख्ख यश मिळवले आहे. रेणुकाने मिळविलेल्या यशाने वडील दयानंद सावंत हे भारावून गेले आहेत. त्यांना दोन्ही मुलीच असल्या तरी मुले असल्याचे समजून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण देण्यासाठी ते कुठेच कमी पडलेले नाहीत.