सौंदलगा जवळील भीषण अपघातात इचलकरंजीचे २ जण ठार - पुढारी

सौंदलगा जवळील भीषण अपघातात इचलकरंजीचे २ जण ठार

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत कळंत्रे मळयासमोर भरधाव कार चालकाचा ताबा सुटून सुमारे शंभर फूट खाली शेतवाडीत जाऊन कोसळल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघे जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी रात्री 9:30 च्या सुमारास झाला. अपघातातील मृत दोघे इचलकरंजी येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांची नावे मिळू शकली नाहीत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कागल येथून निपाणीच्या दिशेने जाणारी कार सौंदलगा जवळील कळंत्रे मळा येथे असलेल्या लहान भुयारी मार्गाजवळ आली. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक चार ते पाच सिमेंटच्या पोलला धडक देऊन सुमारे शंभर फुट फरपटत जाऊन पलटी झाली.

यावेळी झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर चालकाच्या बाजूला बसलेला अन्य एक जण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी निपाणी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सीपीआय संगमेश शिवयोगी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार यांच्यासह रस्ते देखभाल जय हिंद कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक प्रकाश बामणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारासाठी हलविले व अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. या अपघाताची भीषणता इतकी होती की कारची चाके तुटून बाजूला पडली होती. तर कार सुमारे शंभर फुट फरपट जाऊन पलटी होऊन शेतवडीत जाऊन कोसळल्याने कारचा चक्काचूर झाला.

Back to top button