कागवाड; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने देशात प्रदीर्घ काळ सत्ता भोगली. मात्र सत्ता भोगत असताना या पक्षाने भ्रष्टाचाराला खतपाणी घालत जनसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारला. याउलट केंद्रातील भाजपने अल्पावधीत भ्रष्टाचाराला मूठमाती देत प्रत्येक योजनेतील पैशाला कात्री लागू नये याची दक्षता घेतली आहे. लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर शासनाचा पैसा जमा होत असल्याने जनतेसाठी आर्थिक उन्नतीचे दिवस आले आहेत, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
राज्यातील भाजप सरकारने महात्मा बसवेश्वरांच्या विचारानुसार कार्य करत सर्वांगीण विकास साधला आहे. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत दोन तृतीयांश जागा प्राप्त होऊन बहुमताने भाजपची सत्ता प्रस्थापित होईल, असाही सिंह यांनी व्यक्त केला. कागवाड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ. श्रीमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सिंह बोलत होते.