मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, आरटी-पीसीआरचा निर्णय दसर्‍यानंतर | पुढारी

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, आरटी-पीसीआरचा निर्णय दसर्‍यानंतर

बेळगाव, निपाणी : पुढारी वृत्तसेवा : दसर्‍या संपल्यानंतर कोरोना तज्ज्ञांशी चर्चा करून सीमाभागातील आरटी-पीसीआर तपासणीची सक्‍ती हटवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने सीमा नाक्यांवरील आरटी-पीसीआर चाचणीची सक्‍ती हटवावी, अशी शिफारस जिल्हाधिकार्‍यांनी राज्य सरकारला केली आहे. मात्र, त्याबाबत निर्णय दसर्‍यानंतरच घेतला जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री मंगळूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटकला लागून असलेल्या केरळ आणि महाराष्ट्र राज्यातील कोरोना संसर्गाचा तज्ज्ञांकडून आढावा घेतला जात आहे. दसरा संपल्यानंतर शासन तज्ज्ञांशी चर्चा करणार असून, त्यानंतरच सीमावर्ती जिल्ह्यामध्ये सध्या लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करायचे की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल. प्राथमिक शाळांचे वर्ग भरवण्याबाबतही याच वेळी निर्णय घेण्यात येईल.

आरटीपीसीआर चाचणीची सक्ती रद्द करण्यात आली आहे, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्याबाबत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले, अद्यापही आरटीपीसीआरची सक्ती कायम असून अन्य राज्यातील प्रवाशांकडे आरटीपीसीआर प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश मिळणार नाही. आरटीपीसीआर सक्ती हटवण्यात यावी, अशी शिफारस आम्ही शासनाकडे केली आहे. याबाबत शासन निर्णय घेणार आहे.

दरम्यान, बुधवारी दिवसभर कोगनोळी तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करणार्‍यांची प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात आला, अशी माहिती निपाणी तालुका प्रशासनाने दिली.

अकरा नाक्यांवर तपासणी

सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील सीमावर्ती भागामध्ये अकरा तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. इथून आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. पोलिस कर्मचार्‍यांबरोबरच आरोग्य विभागाचे कर्मचारी येथे नियुक्‍त करण्यात आले आहेत. आरटी-पीसीआरच्या सक्‍तीमुळे सध्या महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवाही बंद आहे.

Back to top button