बंगळूर : विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार | पुढारी

बंगळूर : विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : म्हैसूरमध्ये एमबीएच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर महिनाभराच्या अंतराने एका शालेय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाला आहे. मंगळूर जिल्ह्यातील बंटवाळ शहरात शाळकरी विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार करण्यात आले.

पाच जणांनी हे कृत्य केल्याचा संशय असून, चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओळखीच्याच व्यक्तीने अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी हा प्रकार घडला. पीडित विद्यार्थिनीने कुटुंबीयांना शुक्रवारी रात्री ही माहिती दिल्यानंतर शनिवारी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.

शुक्रवारी सकाळी 7 वाजता पीडित विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेला निघाली होती. त्यावेळी पांढर्‍या रंगाच्या कारमधून आलेल्या तिच्या परिचयाच्या व्यक्तीने तिला शाळेला सोडण्याचे निमित्त शोधून तिचे अपहरण केले. नजीकच्या गावामध्ये एका खोलीत नेऊन तिला डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार करण्यात आले. पीडित विद्यार्थिनीने ही माहिती आपल्या कुटुंबीयांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थिनीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीवरून बंटवाळ पोलिसांत ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे समजते. यामध्ये बहुतेक जण तिच्या परिचयातील असल्याचा अंदाज असून पोलिस तपास करीत आहेत. अत्याचार केल्यानंतर तिला कारमधून टोलगेटनजीक सोडण्यात आले. त्यानंतर तिने घर गाठले आणि पालकांना याबाबत माहिती दिली.

कर्नाटकात दीड महिन्याच्या अंतराने उघडकीस आलेली ही सामूहिक अत्याचाराची तिसरी घटना आहे. 23 ऑगस्ट रोजी म्हैसूरमधील तिप्पयनकेरे परिसरात एमबीएच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास ती आपल्या मित्राबरोबर फिरावयास गेली होती. सहा जणांनी तिच्यावर अत्याचार केला होता. या घटनेची देशभर चर्चा झाली होती. याप्रकरणी काही दिवसांतच तामिळनाडूतील 7 जणांना अटक केली होती.

त्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनात महिला आमदारांनी म्हैसूर घटनेबाबत राज्य सरकारवर टीका केली होती. यादगिरी जिल्ह्यातील शहापूर येथे विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. विवाहितेने अत्याचाराला विरोध केल्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्यात आले. ही घटना 13 सप्टेंबरला उघडकीस आली.

गृहमंत्री ज्ञानेंद्रनी घेतली माहिती

गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी तत्काळ मंगळूर पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची संपूर्ण माहिती घेऊन तातडीने संशयितांचा शोध घेण्याची सूचना केली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे.

वाढते अत्याचार

23 ऑगस्ट : म्हैसूरजवळच्या चामुंडी हिल्स परिसरात एमबीएच्या विद्यार्थिनीवर 6 जणांकडून बलात्कार. तत्पूर्वी, विद्यार्थिनीच्या मित्राला मारहाण. सहाही संशयितांना अटक.

13 सप्टेंबर : यादगिरी जिल्ह्यात एका महिलेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे उघड. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चौघांना अटक

9 ऑक्टोबर : बंटवाळमध्ये शाळकरी विद्यार्थिनीचे अपहरण करून पाच जणांकडून अत्याचार.

Back to top button