बहुमत दिल्यास कर्नाटक नं. १ चे राज्य बनवू : अमित शहा | पुढारी

बहुमत दिल्यास कर्नाटक नं. १ चे राज्य बनवू : अमित शहा

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्यात चढाओढ सुरू आहे. असे असताना राज्याचा विकास होणे अशक्य आहे. त्यासाठी भाजपला बहुमत द्या, कर्नाटकाला दक्षिण भारतातील नंबर 1चे राज्य बनवू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळ्ळारी येथील एस. आर. एस. मैदानावर आयोजित विजय संकल्प यात्रेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत होते.

ही भूमी हरिहर व बुक्क, श्रीकृष्ण देवराय यांची आहे. यशवंतराव घोरपडे यांचे जीवन घडलेल्या भूमीमध्ये मी बोलत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. एकदा पंतप्रधान मोदी व येडियुराप्पा यांच्यावर विश्वास ठेवून भाजपला बहुमत द्यावे. कर्नाटक राज्य भ्रष्टाचार मुक्त करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

शहा म्हणाले, राहुल गांधी हे तुकडे-तुकडे गँगला घेऊन देश तोडण्याचे काम करत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भाजपने समर्थ सरकार दिले आहे. देशाला संघटित करून देशाची प्रतिमाही उंचावली आहे. कर्नाटकामध्ये भाजपला बहुमत मिळवून देण्याचा संकल्प करा. निजदला देण्यात येणारे प्रत्येक मत काँग्रेसला जाणार आहे. काँग्रेसला देण्यात येणारे प्रत्येक मत सिद्धरामयांच्या एटीएम सरकारला जाणार आहे. कुटुंबाचे राजकारण करणारे निजद आणि काँग्रेस पक्ष पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडाले आहेत. लोकशाहीमध्ये कुटुंबाचे राजकारण करणार्‍या पक्षांकडून जनतेचे कल्याण शक्य नसल्याचे शहा यांनी सांगितले.

मोदींचे नेतृत्व हवे

तत्पूर्वी शहा यांनी संडोरी येथे आयोजित विजय संकल्प यात्रेमध्ये सहभाग घेतला होता. कर्नाटकाच्या विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन मोदींनी पीएफआयवर निर्बंध घातले आहेत. मात्र, काँग्रेस पक्ष सत्तेत असताना त्यांनी पीएफआय नेत्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले होते. अयोध्येतील राम मंदिर उभारण्याच्या कामाला विलंब होण्यास काँग्रेस पक्षाच कारणीभूत आहे. मोदींच्या धाडसी नेतृत्वामुळे राम मंदिर उभारण्याच्या कामाला गती मिळाली आहे.
माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पक्षाला 140 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मंत्री बी. श्रीरामलू, प्रदेशाध्यक्ष नवीनकुमार कटिल, राज्य प्रभारी अरुण सिंग, मंत्री शशिकला जोल्ले, आनंद सिंग, खासदार देवेंद्राप्पा, करडी संगन्ना व पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button