कर्नाटक विधानसभा निवडणूक मे महिन्यात होणार | पुढारी

कर्नाटक विधानसभा निवडणूक मे महिन्यात होणार

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  विद्यमान भाजप सरकारचा कार्यकाळ मेअखेर संपुष्टात येणार आहे. त्याआधी नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने याआधीच अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या असून, दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याची माहिती आयोगाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. पहिला टप्पा 7 मे रोजी आणि दुसरा टप्पा 14 मे रोजी होणार आहे. 21 मे रोजी निकाल जाहीर होणार असून 23 मे आधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपण्याआधी नवे सरकार अस्तित्वात आणणे गरजेचे असते. त्यामुळे निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्याबाबत तयारी सुरू आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांबाबत शिक्षण खात्याकडून माहिती मागवण्यात आली आहे. शिवाय मान्सूनबाबतही हवामान खात्याकडून माहिती घेतली जात आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून कर्नाटकात प्रवेश करणार असल्याचे हवामान खात्याने अहवालात म्हटले आहे.

शिक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा एप्रिलअखेर संपणार आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांतील खोल्या रिकाम्या असतील. शिवाय शिक्षकांसह इतर कर्मचारी निवडणूक कामासाठी उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकारलाही निवडणुकीचा अंदाज आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याआधी सर्व सरकारी कार्यक्रम उरकण्याची घाई केली जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदी चारवेळा कर्नाटक दौरा करणार आहेत.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या वाढदिनी 27 फेब्रुवारी रोजी शिमोग्यातील विमानतळाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते केले जाणार आहे. बळ्ळारीतील खाणशाळेची कोनशिला, दावणगिरीत जाहीर सभा, चिक्कबळ्ळापुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे लोकार्पण अशा कार्यक्रमांत मोदी सहभागी होणार आहेत.

मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात वेळापत्रक

भाजपच्या कार्यकाळातील शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपेल. त्यानंतर निवडणूक वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. मतदानाच्या 45 दिवस आधी निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्याचा नियम आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर तत्काळ निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे.

Back to top button