विधानसभा निवडणुक : काँग्रेसच्या सर्वच आमदारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता | पुढारी

विधानसभा निवडणुक : काँग्रेसच्या सर्वच आमदारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणुकीत शंभरपेक्षा अधिक उमेदवारांची पहिली यादी १० फेब्रुवारीपर्यंत काँग्रेसकडून जाहीर केली जाणार आहे. विद्यमान सर्व आमदारांना यंदाही उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे. पण, रस्सीखेच असणाऱ्या ठिकाणी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी भाजपने कर्नाटकातही गुजरात राबविण्याचा विचार सुरू केला आहे. ७० वर्षांवरील नेत्यांना विश्रांती देण्यात आल्यास विद्यमान सुमारे ३० आमदारांना उमेदवारी हुकण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी २ ते ३ वेळा पाहणी केली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज केलेल्यांची पार्श्वभूमी जिंकण्यासाठीचे मापदंड आदींची माहिती पाहणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. २ फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक समितीच्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा केली जाणार आहे. बहुतेक सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. रस्सीखेच असणाऱ्या ठिकाणी दोन नावे नमूद करून ती केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्याचा निर्णय राज्य निवडणूक समितीने घेतला आहे. केंद्रीय निवडणूक समिती संबंधित इच्छुकांबाबत आपल्या सूत्रांकडून माहिती संग्रहित करणार आहे. त्यानंतर नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

विधानसभा निवडणूक तयारीत पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. भाजपची उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच आपली यादी जाहीर करण्याची घाई काँग्रेस करत आहे. प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाल्यास मतदारांवर प्रभाव पाडणे शक्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. प्रजाध्वनी यात्रेआधीच उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार होती. पण, या यात्रेवेळी विनाकारण गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून यात्रेनंतर उमेदवार यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारीअखेर यात्रा संपणार आहे. त्यानंतर उमेदवार निवडीची कसरत केली जाणार आहे.

भाजपकडून ३० आमदारांचा पत्ता कट?

भाजप श्रेष्ठींनी आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. येथेही गुजरात पॅटर्न राबविण्याचा विचार सुरू आहे. ७३ वर्षांवरील नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात येणार आहे. तसे झाल्यास सुमारे ३० विद्यमान आमदारांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागण्याची शक् • आहे. सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. भाजपच्या उमेदवार यादीला विलंब होण्याची शक्यता आहे.

Back to top button