बंगळूर : प्रभावी नेत्यांची कुंडली आपल्या हातात! सँट्रो रवी याची पोलिसांना धमकी | पुढारी

बंगळूर : प्रभावी नेत्यांची कुंडली आपल्या हातात! सँट्रो रवी याची पोलिसांना धमकी

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : अनेक प्रभावी नेत्यांची कुंडली आपल्या हातात आहे. त्यासाठी काय करायचे ते आपल्याला माहीत आहे. योग्यवेळी सर्वकाही उघड करण्याची धमकी सँट्रो रवीने पोलिसांना दिली आहे.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये सँट्रो रवीला अटक करण्यात आली. त्याला म्हैसूरला आणण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीचे नेतृत्व वरिष्ठ अधिकारी अलोक कुमार करत आहेत. आपला संपर्क काही वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांशी आहे. गृहमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी, पोलिस महासंचालक कार्यालयातील अधिकार्‍यांशी संपर्क असल्याबाबत त्याने कळवले आहे. पण, अधिक माहिती देण्यास नाकारल्याचे समजते.

सध्या मोठ्या पदावर असणार्‍या राजकारण्यांचे निकटवर्तीय, वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्याच्या मोबाईलवर पाठवलेले संदेश पोलिसांनी तपासले आहेत. मोबाईलमधील काही दृश्ये पाहून अलोक कुमारही अचंबित झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस अधिकार्‍यांच्या बदली प्रक्रियेत त्याचा हात होता, असे उघड झाले आहे. सँट्रो रवीसह रामजी (वय 45), सतीश कुमार (वय 35) व मधुसूदन या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. वेश्या व्यवसायापासून सरकारी अधिकार्‍यांच्या बदली प्रक्रियेत सँट्रो रवीचा हात असायचा, असेही उघड झाले आहे. काही युवती, महिलांना त्याने फूस लावून वेश्या व्यवसायात आणल्याचे पोलिस तपासात दिसून आले आहे. त्याच्याविरुद्ध 1995 पासून आतापर्यंत बंगळूरसह, मंड्या, म्हैसूर येथील पोलिस ठाण्यांत 22 गुन्हे दाखल आहेत.

2005 मध्ये तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता. त्याच्याविरुद्ध गुंडा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारागृहात असतानाही तो काही गुंडांच्या संपर्कात होता. लग्न, रोजगार विविध आमिष दाखवून त्याने अनेक युवतींना वेश्या व्यवसायात आणले होते. यासाठी त्याने आपली सँट्रो कार वापरली होती. यावरुनच त्याचे नाव सँट्रो रवी असे पडले.

सँट्रो रवीच्या अटकेआधी गृहमंत्री गुजरातला का? : एच. डी. कुमारस्वामी

बंगळूर : राज्यातील राजकारणात चर्चेत असणार्‍या सँट्रो रवीला अटक झाली आहे. त्यामागे काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्याच्या अटकेआधी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र गुजरातला का गेले होते? सँट्रो रवीला त्यांनी कोणते आश्वासन दिले? असे प्रश्न माजी मुख्यमंत्री व निजद श्रेष्ठी एच. डी. कुमारस्वामी यांनी उपस्थित केले आहेत. बंगळूर प्रेस क्लबतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सँट्रो रवी पुणे येथे होता. तो गुजरातला कसा पोहोचला, याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याला गुजरातला नेण्यात आले. तेथे त्याला आश्वासन देऊन अटक करण्याचे नाटक केले.

आपल्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना दलालांच्या हातात अधिकार्यांच्या बदल्या नव्हत्या. बेटिंग करणार्यांनी सरकार नियंत्रणात ठेवले नव्हते. आतापर्यंत कर्नाटकाने पाहिलेले हे सर्वात वाईट सरकार आहे. याआधी असे सरकार कधीच पहावयास मिळाले नव्हते. अनेक महनीयांच्या श्रमामुळे राज्याचा विकास शक्य झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील लव जिहादच्या नावावर राज्यातील युवावर्गाला भडकवत आहेत. एच. डी. देवेगौडा, एस. एम. कृष्णा यांच्यासारख्या नेत्यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक योजना राबवल्या. त्यामुळे आज तंत्रज्ञानात कर्नाटक पुढे आहे. यातून हजारो कोटींचा महसूल जमा होत असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले.

Back to top button