बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी हुबळीत | पुढारी

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी हुबळीत

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. 12) हुबळीत येणार आहेत. तेथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन ते करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, एकूण सात दिवस राष्ट्रीय युवा महोत्सव होणार आहे. देशातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील युवक-युवती यामध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन हुबळीत होणार आहे. सर्व सांस्कृतिक व इतर कार्यक्रम धारवाडमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. धारवाडमधील कर्नाटक कॉलेज, कर्नाटक विद्यापीठ, कृषी विद्यापीठाला जोडणार्‍या एकूण 12 रस्त्यांची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. गटार स्वच्छता, कचरा निर्मूलन आदी कामेही केली जात आहेत. महापालिकेच्या 100 कर्मचार्‍यांना घेऊन साफसफाई केली जात आहे.

19 जानेवारी रोजी पुन्हा पंतप्रधान मोदी राज्याच्या दौर्‍यावर येत आहेत. नारायणपूर कालव्याचे आधुनिकीकरण केले आहे. याचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर गुलबर्गा येथे बंजारा मेळाव्यातही ते भाग घेणार असल्याचे बोम्मई यांनी सांगितले.

Back to top button