बेळगाव : वाहन झाडावर आदळून सहा ठार; रामदुर्ग तालुक्यातील घटना | पुढारी

बेळगाव : वाहन झाडावर आदळून सहा ठार; रामदुर्ग तालुक्यातील घटना

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांनी गच्च भरलेले भरधाव मालवाहू वाहन झाडावर जाऊन आदळले. यामध्ये वाहनातील पाचजण जागीच ठार झाले तर, एका महिलेचा रूग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. यामध्ये 23 जण जखमी झाले असून त्यापैकी 8 जण गंभीर आहेत. रामदुर्ग तालुक्यातील चुंचनूर येथे बुधवारी रात्री 11.50 वा. हा अपघात घडला.मृतांमध्ये तीन महिला व दोन युवतींचा समावेश आहे. मृत व जखमी हुलकुंद (ता. रामदुर्ग) येथील असून हे सर्वजण सौंदत्ती यल्लम्मा यात्रेला निघाले होते.

इंद्रव्वा फकीराप्पा सिद्दमेत्री (वय 24), दीपा शंकर हरिजन (वय 31), सरिता लक्ष्मण मुंडास (वय 17), मारुती यल्लाप्पा बन्नूर (वय 42), सुप्रिया शंकर हरिजन (वय 11) हे पाचजण जागीच ठार झाले. हणमव्वा श्रवण म्यागडी (वय 25, रा. हुलकुंद) ही महिला उपचार सुरू असताना मृत पावली. सौंदत्ती यल्लम्माची शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यात्रा असल्याने हुलकुंद गावातील तब्बल 30 जण मालवाहू वाहनातून (केए-25 बी-5580) सौंदत्तीला निघाले होते. गावातून निघून काही अंतरावरील कटकोळ-मुनवळ्ळी रस्त्यावरील चुंचनूर जवळील विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ वाहन आले तेव्हा वाहनचालक बसवराज फकीराप्पा अगलन्नवर (रा. हुलकुंद, ता. रामदुर्ग) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहनाची रस्त्याकडेच्या वडाच्या झाडाला जोरदार धडक बसली. या अपघाताची माहिती समजताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रू. भरपाई देणार असल्याचे जाहीर केले.

अधिक वाचा :

Back to top button