बेळगाव : वृद्धेचे साडेनऊ तोळे दागिने लांबवले; न्यू गुडशेड रोडवरील घटना | पुढारी

बेळगाव : वृद्धेचे साडेनऊ तोळे दागिने लांबवले; न्यू गुडशेड रोडवरील घटना

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : लघुशंकेसाठी मध्यरात्री घराबाहेर आलेल्या वृद्धेच्या गळ्यातील तब्बल साडेनऊ तोळ्यांचे दागिने भामट्यांनी लांबवले. शकुंतला भीमराव यादव (वय ८०, रा. न्यू गूडशेड रोड) असे या वृद्धेचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास न्यू गुडशेड रोड तिसरा क्रॉस येथे ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, शकुंतला या नेहमीप्रमाणे शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास लघुशंकेसाठी उठल्या. यावेळी तिघा संशयितांनी त्यांच्या अंगावर दागिने पाहून त्यांना अडवले. मास्क घातलेल्या या तिघांनी सदर वृद्धेला घट्ट पकडले. त्यांची कर्णफुले, सोनसाखळी, पाटल्या, बिलवर असे सुमारे पाच लाखांचे तब्बल साडेनऊ तोळ्यांचे दागिने लांबवले.

घाबरलेल्या आजी रात्री तशाच घरात जाऊन झोपल्या. परंतु, मध्यरात्री घडलेली ही घटना त्यांनी शुक्रवारी सकाळी घरच्यांना सांगितली. आपले दागिने कसे हिसकावून नेले याचा तपशील दिला. त्यानंतर कुटुंबियांनी खडेबाजार पोलिस ठाणे गाठून याबाबतची माहिती दिली. खडेबाजार पोलिसांनी याची नोंद घेतली असून निरीक्षक दिलीप निंबाळकर तपास करीत आहेत.

Back to top button