बेळगाव : काँग्रेस, निजद भ्रष्ट परिवाराचे पक्ष : अमित शहा | पुढारी

बेळगाव : काँग्रेस, निजद भ्रष्ट परिवाराचे पक्ष : अमित शहा

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस आणि निजद हे भ्रष्टाचारी परिवारातून आले आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेला भ्रष्ट कारभार स्वच्छ करण्याचे काम भाजपने केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमताने विजयी करावे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आता भाजप हाच उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

बंगळुरातून थेट मंड्यामधील मद्दूर येथे मेगा डेअरीच्या उद्घ़ाटनावेळी ते बोलत होते. मंड्या विद्यापीठाच्या मैदानात यानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस आणि निजद हे दोन्ही पक्ष गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. दलित, आदिवासींकडे त्यांनी आतापर्यंत पाहिलेले नाही. या दोन्ही पक्षांनी त्यांच्यावर अन्याय केला. पण, भाजपने आतापर्यंत रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपद देऊन दलितांबाबत असणारी काळजी दाखवून दिल्याचे ते म्हणाले.

भाजप प्रशासनाच्या काळात गरिबांना अन्नपुरवठा करुन स्वावलंबी बनवण्याचे काम झाले आहे. गरिबांच्या घरात प्रकाश, शौचालय निर्माण झाले आहे. त्यांना मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. देश सुद़ृढ बनवला आहे. भारताची शक्ती काय आहे ते जगाला दाखवून देण्याची गरज आहे. त्यामुळे मंड्यासह जुने म्हैसूर भागात भाजपला विजयी करणे आवश्यक आहे. पुढील तीन वर्षांत देशातील प्रत्येक पंचायत पातळीवर एक प्राथमिक डेअरी स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी सर्व तयारी केली जाईल. अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी काँग्रेसकडून त्रास देण्यात आला. तरीही पंतप्रधान मोदी यांनी रामजन्मभूमीतच मंदिर निर्माण कार्य केले. काँग्रेस आणि निजदने मंड्यासह परिसराच्या विकासासाठी कोणतेही योगदान दिले नाही. या भागातील शेतकर्‍यांसाठी 1200 कोटींचे विशेष अनुदान भाजपने दिल्याची माहिती शहा यांनी दिली.

Back to top button